साताऱ्याच्या चित्रपट पर्यटनाला हप्तेखोरीचे ग्रहण - माहुलीत निर्मात्याकडे खंडणीची मागणी


सातारा : निसर्गसौंदर्य आणि ऐतिहासिक वारशामुळे 'चित्रपट निर्मात्यांचे नंदनवन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्याला आता हप्तेखोरी आणि दादागिरीची लागण झाली आहे. क्षेत्रमाहुली येथील कृष्णामाई घाटावर चित्रीकरणासाठी आलेल्या एका निर्मात्याकडे २५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, यामुळे चित्रपटसृष्टीत संतापाची लाट पसरली आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथील कृष्णामाई घाटावर एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना, संबंधित निर्मात्याला फोनवरून अश्लील शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. चित्रीकरण सुरळीत सुरू ठेवण्यासाठी संशयित आरोपीने २५ हजार रुपयांची मागणी केली. धमकावण्याला घाबरून निर्मात्याने २० हजार रुपये दिले खरे, पण गुंडगिरीसमोर न झुकता त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.

वाईतील चित्रपट सृष्टी आधीच संकटात
केवळ सातारा शहरच नव्हे, तर वाई तालुक्याची अवस्थाही बिकट झाली आहे. एकेकाळी हिंदी आणि मराठी चित्रपटांचे 'माहेरघर' असलेल्या वाईतून आता निर्मात्यांनी पाठ फिरवली आहे. शासकीय परवाने आणि रीतसर शुल्क भरूनही स्थानिक 'विघ्नसंतोषी' टोळ्यांकडून बेकायदेशीर हप्ते मागितले जातात. हप्ते न दिल्यास चित्रीकरण बंद पाडण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने निर्मात्यांनी आता इतर राज्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे.

स्थानिक रोजगाराचे कंबरडे मोडले
चित्रपट चित्रीकरणामुळे साताऱ्यात केटरिंग, ट्रान्सपोर्ट, लॉजिंग आणि हॉटेलिंग यांसारखे मोठे व्यवसाय उभे राहिले होते. मात्र, चित्रीकरणाचे प्रमाण घटल्याने हजारो तरुणांवर उपासमारीची वेळ आली आहे. "निसर्गाने आम्हाला भरभरून दिले, पण काही गावगुंडांमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत आहे," अशी खंत स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

प्रशासनासमोर मोठे आव्हान
संबंधित निर्मात्याने कायदेशीर लढा देऊन एक आदर्श घालून दिला आहे. मात्र, आता चेंडू पोलीस प्रशासनाच्या कोर्टात आहे. साताऱ्याची ओळख 'शूटिंग हब' म्हणून टिकवून ठेवायची की ती 'खंडणी हब' होऊ द्यायची, याचा निर्णय कडक कारवाईतून घेण्याची वेळ आली आहे


न्यूज मराठी लाईव्ह 
सातारा 

Post a Comment

Previous Post Next Post