प्रतिनिधी | अनिल मोरे
कराड : कराड–विटा रोडवरील कृष्णा नदी पुलाच्या दोन्ही बाजूंना तातडीने संरक्षण जाळी बसवण्यात यावी, या मागणीसाठी रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन व उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
कराड–विटा मार्गावरील कृष्णा पुलावरून गेल्या काही दिवसांत महिलांनी व युवतींनी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. पुलावरील संरक्षण भिंतीची उंची अत्यंत कमी असल्याने सहज काठड्यावर चढता येते. त्यामुळे हा पूल आत्महत्येसाठी सोपा मार्ग बनत असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
या घटना रोखण्यासाठी रक्षक प्रतिष्ठानने पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षण जाळी बसवण्याची मागणी सातत्याने केली असून यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी याच मागणीसाठी रक्षक प्रतिष्ठानने रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी करून सुमारे ४३ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते.
या विषयात खासदार उदयनराजे भोसले यांनीही पत्राद्वारे राष्ट्रीय महामार्ग विभागाला तातडीने संरक्षण जाळी बसवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र प्रशासनाने याकडे गांभीर्याने दुर्लक्ष केल्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका युवतीने पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आंदोलन सुरू झाल्यानंतर काही तासांतच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत महाजन यांनी उपोषणस्थळी भेट देत संरक्षण जाळी बसवण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे सांगितले. मात्र, जोपर्यंत लेखी मंजुरीचे पत्र मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन व उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा ठाम इशारा रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी दिला आहे.
कृष्णा पुलावर तातडीने संरक्षण जाळी बसवली नाही, तर भविष्यात आणखी दुर्दैवी घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत असून प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
कराड / सातारा

Post a Comment