प्रतिनिधी | श्री. बजरंग चौधरी
मेढा (जावली) : जावळी तालुका वारकरी संघ तसेच जगदगुरू श्री तुकोबाराय चॅरिटेबल ट्रस्ट, जावळी यांच्या वतीने मोहाट (ता. जावळी) येथे ११ एकर जागेवर भव्य श्री संत तुकोबाराय मंदिर प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पास महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य दिले जाईल, असे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री. ज्ञानदेव रांजणे यांनी केले.
मोहाट येथे वारकऱ्यांच्या भेटीप्रसंगी बोलताना श्री. रांजणे म्हणाले की, “ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस” या उक्तीप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असलेले जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या मुळभूमीत उभारले जाणारे हे मंदिर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरेल.
जावळी तालुका ही संत तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वज श्री. विश्वंभरबाबा यांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी असून, याच भूमीत श्री संत तुकोबाराय मंदिरासह विविध लोकोपयोगी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पात सर्वांनी तन-मन-धन अर्पण करून सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळकृष्ण महाराज शिंदे यांनी केले.
या प्रकल्पासाठी जाणारा रस्ता, पाणीपुरवठा व वीज व्यवस्था अत्यावश्यक असून पुढील तीन महिन्यांत या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी भूमिका श्री. ज्ञानदेव रांजणे यांच्यासमोर मांडण्यात आली. मेढा येथील पारायण सोहळ्यात जाहीर केल्याप्रमाणे, मा. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून या प्रकल्पास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. रांजणे यांनी स्पष्ट केले.
श्री संत तुकोबाराय मंदिर प्रकल्पामुळे जावळी तालुक्यात पर्यटनाला चालना मिळेल. भक्ती आणि शक्तीचे प्रतीक ठरणारा हा प्रकल्प पर्यटकांना आध्यात्मिकतेच्या मार्गावर नेईल. त्यामुळे राजकीय, सामाजिक व आध्यात्मिक अशा सर्व स्तरांतून या प्रकल्पाला निश्चितच सहकार्य मिळेल, आणि दिलेली कोणतीही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उद्योजक एस. एस. पार्टे गुरुजी, ट्रस्टचे उपाध्यक्ष मोहनबापू वारागडे, सचिव विलासबाबा जवळ, प्रविण महाराज शेलार, सुभाष महाराज मिस्त्री, विलास पवार, तुकारामबुवा जवळ, सरपंच विलास धनावडे, विष्णूपंत धनावडे, विष्णू धोंडीबा धनावडे, रामचंद्र धनावडे, अंकुश धनावडे यांच्यासह ग्रामस्थ व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज मराठी लाईव्ह
मेढा / जावली


Post a Comment