विद्यानगर परिसरात ट्रॅफिक पोलिसांची धडक कारवाई ट्रिपल सीट व भरधाव वाहनचालकांवर कडक दंडात्मक कारवाई

कराड प्रतिनिधी | श्री.अनिल मोरे

कराड : विद्यानगर परिसरात रस्त्यावर रेस लावणे, ट्रिपल सीट दुचाकी चालवणे तसेच भरधाव वेगाने वाहन चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात ट्रॅफिक पोलिसांनी धडक कारवाई केली. सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेल्या या विशेष मोहिमेत तब्बल चार तास मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कृष्णा कॅनॉल ते एस.जी.एम. कॉलेज या मार्गावर चार ट्रॅफिक पोलिस वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. या दरम्यान ट्रिपल सीट दुचाकी चालवणारे, भरधाव वेगाने रेस करणारे तरुण तसेच वाहनांचे आवश्यक कागदपत्रे नसलेले चालक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत एकूण २९ केसेस दाखल करण्यात आल्या. यामध्ये चार बुलेट दुचाकींवर ट्रिपल सीटबाबत कारवाई करण्यात आली असून सहा इतर वाहन चालकांसह अनेकांवर दंड ठोठावण्यात आला आहे.

विद्यानगर परिसरात वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही धडक कारवाई करण्यात आल्याचे ट्रॅफिक पोलिसांनी सांगितले. भविष्यातही अशा प्रकारची अचानक तपासणी व कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल राहुल माळी, पोलीस हवालदार रतन चव्हाण, महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा शेवाळे, महिला पोलीस हवालदार अश्विनी सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.

वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून नियम मोडणाऱ्यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे ट्रॅफिक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


न्यूज मराठी लाईव्ह 
कराड / सातारा 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने