सांगलीतील आदरातिथ्याने महिला गहिवरल्या; “दर्शनवारी” जवळवाडी महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम —आनंदाशेठ सावंत

प्रतिनिधी | श्री.बजरंग चौधरी


मेढा : जवळवाडी (ता. जावळी) येथील महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा “दर्शनवारी” हा उपक्रम महिला सशक्तीकरण व मानसिक आनंदाचा उत्तम नमुना ठरत आहे. घर, प्रपंच व शेतीच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिलांना थोडासा विरंगुळा मिळावा, देवदर्शनासोबतच प्रेरणादायी ठिकाणांचा अनुभव घेता यावा या उदात्त हेतूने हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने राबविला जात आहे.

यावेळी जावळी तालुक्यातील सांगलीस्थित उद्योजक आनंदाशेठ सावंत यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “देवदर्शनासोबतच आदर्श गावे व तेथील प्रेरणादायी उपक्रम पाहण्याची संधी महिलांना मिळते, हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व अनुकरणीय आहे.”

जवळवाडी महिला मंडळाने यापूर्वी पंढरपूर, आळंदी, देहू येथे दर्शनवारीचे आयोजन केले होते. यावर्षीची दर्शनवारी जोतिबा, महालक्ष्मी, कण्हेरी मठ व नृसिंहवाडी या मार्गावर यशस्वीरीत्या पार पडली. जोतिबा मंदिरात महिलांनी झिम्मा-फुगडीचा फेर धरत भक्ती व आनंदाचा उत्सव साजरा केला. यावेळी दर्शनासाठी आलेल्या शहरी भागातील महिला भाविकही या आनंदात सहभागी झाल्या.

कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर दर्शनानंतर दुपारी महिलांनी आपापल्या चिवड्याच्या पुड्या उघडत हास्यविनोदात भूक भागवली. यावेळी महिलांनी उत्स्फूर्तपणे म्हटले—
“आली आली जवळवाडीची दर्शनवारी,
कोल्हापूरच्या महालक्ष्मी दरबारी,
सोबतीला खमंग, कुरकुरीत, लज्जतदार भारी—
‘महालक्ष्मी रिटकवली’ चिवड्याची चवच न्यारी!”

यानंतर दर्शनवारीचा ताफा सिद्धगिरी कण्हेरी मठ येथे पोहोचला. तेथील गार्डन व म्युझियम पाहून महिला अत्यंत आनंदित झाल्या. पुढे नृसिंहवाडी येथील घाटावर श्री दत्त दिगंबरांचे दर्शन घेऊन रात्री सुमारे ९ वाजता गाड्या सांगलीत दाखल झाल्या.

सांगली येथील हॉटेल उद्योजक मा. आनंदाशेठ सावंत यांनी आपल्या जन्मभूमीतून आलेल्या सर्व महिलांचे मनःपूर्वक स्वागत केले. श्री गणेश व्हेज थाळीतील मेजवाणी पाहूनच महिलांनी जेवणापूर्वीच समाधानाची भावना व्यक्त करत सावंत यांचे आभार मानले.

यावेळी बोलताना आनंदाशेठ सावंत म्हणाले, “घर-प्रपंचाचा गाडा हाकणाऱ्या माता-भगिनींना दर्शनवारीच्या माध्यमातून देवदर्शनासोबत पर्यटनाचा आनंद मिळतो. त्यामुळे जवळवाडी महिला मंडळाचा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य व अनुकरणीय आहे.”

दर्शनवारीच्या वतीने शिवशंभो ग्रामसंघाच्या प्रेरिका राजश्री पाटील यांनी “शून्यामधुनी उद्योगाचे विश्व निर्मिले ध्येयाने, नमन करितो आपल्या कर्तृत्वाला सन्मानाने” अशा शब्दांत सावंत यांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या शेवटी वैशाली जवळ व मनीषा शेडगे यांनी सर्वांचे आभार मानले.


न्यूज मराठी लाईव्ह 
मेढा / जावली

Post a Comment

Previous Post Next Post