प्रतिनिधी | श्री.अनिल मोरे
कराड (सातारा) : शहरातील बुधवार पेठ, वाकण रोड तसेच शिवाजी स्टेडियमच्या पाठीमागील परिसरात काही तरुणांकडून खुलेआम गांजा सेवन सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. या व्यसनाधीनतेमुळे शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून, कराडच्या शांततामय वातावरणाला धोका निर्माण होत असल्याची चिंता यशवंत आघाडी व लोकशाही आघाडीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
या संदर्भात बोलताना यशवंत आघाडीचे प्रमुख तसेच कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव म्हणाले की, केवळ पोलिसी कारवाई पुरेशी नसून तरुणांचे प्रबोधन व व्यसनमुक्ती यावर अधिक भर देणे गरजेचे आहे. काही भागांत पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित तीव्र कारवाई होत नसल्याचे जाणवत असल्याचे त्यांनी नमूद केले. या विषयावर लवकरच पोलीस प्रशासनाशी सविस्तर चर्चा करून ठोस उपाययोजना राबवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कराडची ओळख शांततामय शहर म्हणून कायम राखण्यासाठी यशवंत आघाडी, लोकशाही आघाडी, सामाजिक कार्यकर्ते व विविध सामाजिक संस्थांना एकत्र घेऊन संयुक्तपणे काम केले जाणार आहे. ‘गांजा मुक्त कराड’ हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून येत्या काळात व्यापक जनजागृती मोहिम राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
लोकशाही आघाडीचे उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे म्हणाले,
“आमचा गब्बर ग्रुप असो किंवा कोविड काळात कार्यरत असलेले स्वयंसेवी ग्रुप—या सर्व माध्यमांचा वापर करून गांजा मुक्त कराड घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कराडची शांतता अबाधित ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील.”
लोकशाही आघाडीचे जयंत पाटील यांनी तरुणांना उद्देशून सांगितले की,
“आजच्या तरुणांनी आपल्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे. नियमित व्यायाम, सकारात्मक जीवनशैली आणि व्यसनांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असून, ही जबाबदारी केवळ पोलीस प्रशासनाची नसून पालक, शाळा, महाविद्यालये व विविध अकॅडमी यांचीही तितकीच आहे.”
शहरातील वाढती व्यसनाधीनता रोखण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था व नागरिकांनी एकत्र येऊन ठोस पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
न्यूज मराठी लाईव्ह
कराड / सातारा

टिप्पणी पोस्ट करा