कृष्णा नदी पुलावर सुरक्षा जाळी बसवेपर्यंत दोन सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याची मागणी

प्रतिनिधी | श्री.अनिल मोरे


कराड (सातारा) : शहरातील कृष्णा नदी पुलावर घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पुलावर तातडीने प्रभावी सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर कृष्णा नदी पुलावर सुरक्षा जाळी बसवण्यात यावी, या मागणीसाठी दि. १३ ते १६ जानेवारी २०२६ दरम्यान आमरण उपोषण करण्यात आले होते.

उपोषणाच्या काळात सुरक्षा जाळीचे काम पूर्ण होईपर्यंत किमान दोन सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, अशी विनंती कराड शहर पोलीस ठाण्याला करण्यात आली होती. मात्र, अद्यापही ठोस उपाययोजना न झाल्याने भविष्यात गंभीर घटना घडण्याची शक्यता कायम असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, दि. २९ जानेवारी २०२६ रोजी कृष्णा नदी पुलावर एका महिलेने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही घटना वेळीच रोखण्यात आली. मात्र, या घटनेमुळे पुलावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन ॲड. पद्मजा मिलिंद लाड, ॲड. मिलिंद लाड तसेच रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले. या निवेदनात सुरक्षा जाळी बसवले जाईपर्यंत तातडीने दोन सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, तसेच पुलावर नियमित पेट्रोलिंगचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

सदर निवेदन पोलीस निरीक्षक डी. एम. दराडे यांनी स्वीकारले असून, या विषयावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कृष्णा नदी पुलावर वारंवार घडणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने त्वरित ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


न्यूज मराठी लाईव्ह 
कराड / सातारा 

Post a Comment

Previous Post Next Post