बाबा पंचायत समितीचे सभापती, तर मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होणार – वसंतराव मानकुमरे


कुडाळ (जावली) : कुडाळ पंचायत समिती गणातून सौरभ (बाबा) शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्यास ते जावली पंचायत समितीचे सभापती होतील आणि मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होणारच, असा ठाम विश्वास माजी आमदार वसंतराव मानकुमरे यांनी व्यक्त केला. कुडाळ येथे स्वर्गीय आमदार कै. लालसिंगराव (काका) शिंदे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आयोजित वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.


वसंतराव मानकुमरे पुढे म्हणाले की, म्हसवे गटामध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माझ्या विरोधात दिलेला चेहरा प्रत्यक्षात माझ्यासाठीच फायदेशीर ठरेल. कारण शशिकांत शिंदे यांचा मला कायमच आशीर्वाद राहिला आहे.


कै. आमदार लालसिंगराव (काका) शिंदे यांच्या जयंतीनिमित्त कुडाळ येथे ह.भ.प. प्रवीण महाराज शेलार यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम तसेच वारकरी संप्रदायाचा सन्मान सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या माजी चेअरमन सुनेत्रा (ताई) शिंदे, जावली–महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, कुडाळ विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मालोजीराव (अण्णा) शिंदे, भाजप जावली तालुकाध्यक्ष संदीप परामणे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य शोभाताई बारटक्के, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ, कुडाळ पंचक्रोशीतील विविध विकास सेवा सोसायट्यांचे पदाधिकारी, वारकरी संप्रदाय व सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय लालसिंगराव (काका) शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. उपस्थित वारकऱ्यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. तसेच तालुक्यातील वारकऱ्यांना सौरभ (बाबा) शिंदे यांच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या.

वसंतराव मानकुमरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कै. लालसिंगराव (काका) यांचे कार्य विकासाभिमुख होते. त्यांनी राजकारणापेक्षा समाजकार्यात मोलाचे योगदान दिले असून ते जावलीतील जनता कधीही विसरणार नाही. मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकासाची वाटचाल करत आहोत. येणाऱ्या निवडणुकीत सौरभ (बाबा) शिंदे यांच्यावर विश्वास टाकून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी सौरभ (बाबा) शिंदे म्हणाले की, स्वर्गीय लालसिंगराव (काका) यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि पुढेही ही परंपरा सुरू राहील. काकांनी जावली तालुक्यात सुरू केलेली विकासाची गंगा अखंड सुरू ठेवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्यांच्या व भैय्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सर्वांच्या मार्गदर्शनाने भरून काढण्याचे प्रयत्न सुरू असून, काकांचा विचार जोपासण्यासाठी जनतेची साथ कायम मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी वारकरी संप्रदायाचे आभार सौरभ (बाबा) शिंदे यांनी मानले.

न्यूज मराठी लाईव्ह 
कुडाळ / जावली 

Post a Comment

Previous Post Next Post