प्रतिनिधी | श्री.अनिल मोरे
सातारा : ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, नागठाणे सेवा केंद्राच्या वतीने शाहू स्टेडियम, सातारा येथे महिला सशक्तीकरणाचा प्रभावी संदेश देणारी “स्त्री अस्तित्वाची खरी ओळख” ही संकल्पना साकारण्यात आली. या संकल्पनेवर आधारित भव्य व आकर्षक चित्ररथाचे प्रभावी सादरीकरण उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
या चित्ररथातून “स्त्री ही अबला नसून सबला आहे”, भ्रूणहत्या थांबवा, मला शिकू द्या – मी इंजिनिअर, डॉक्टर होईन, मला जगू द्या – मी इतरांना जगवेन, माझ्यावर अत्याचार करू नका, मला जाळू नका असे सामाजिक संदेश ठळकपणे मांडण्यात आले. स्त्रीचे जीवनातील विविध रूपे—मुलगी, पत्नी, आई, कुटुंबाचा आधारस्तंभ आणि अनुभवाची शिदोरी असलेली आजी—यांचे वास्तववादी व संवेदनशील दर्शन या चित्ररथातून घडविण्यात आले.
या भव्य उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शंभूराजे देसाई, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागार्जुन आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका डॉ. बी.के. सुवर्णा, बी.के. लक्ष्मी, बी.के. वैशाली, बी.के. ऋतुजा यांच्यासह मोठ्या संख्येने ब्रह्मावत्स उपस्थित होते.
या चित्ररथाच्या माध्यमातून स्त्रीच्या अस्तित्वाची खरी ओळख समाजासमोर मांडत महिला सशक्तीकरणाचा सशक्त व प्रेरणादायी संदेश देण्यात आला. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत समाजप्रबोधनासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याची भावना व्यक्त केली.
न्यूज मराठी लाईव्ह
सातारा


टिप्पणी पोस्ट करा