प्रतिनिधी | बजरंग चौधरी
मेढा : कुसुंबी गणात सामाजिक, राजकीय व बचतगट चळवळीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गांजे येथील माजी सरपंच सौ. लक्ष्मी चंद्रकांत चिकणे यांना येणाऱ्या मेढा पंचायत समिती निवडणुकीत कुसुंबी गणातून महिला उमेदवार म्हणून संधी द्यावी, अशी मागणी नागरिक, महिला व कार्यकर्त्यांमधून जोर धरू लागली आहे.
सामान्य कुटुंबात जन्मलेल्या लक्ष्मीताईंचे बालपण कष्ट, प्रामाणिकपणा व स्वावलंबन या मूल्यांत घडले. माहेरी टेलरिंग, टीव्ही केबल, फोटो स्टुडिओ व शेती व्यवसाय असल्याने त्या लहानपणापासूनच दिवसाला १२-१२ तास मेहनत करत आल्या. हीच मेहनत आणि आत्मनिर्भरता त्यांच्या कार्याचा पाया ठरली.
लग्नानंतर गेली तेरा वर्षे त्या आपल्या पती श्री. चंद्रकांत चिकणे (मा. ना. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर कार्यकर्ते) यांच्यासोबत सामाजिक, राजकीय व व्यावसायिक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत.
लोकनियुक्त सरपंच म्हणून भरीव कार्य
मेढा (ता. जावली) येथे फोटोग्राफी व्यवसाय सांभाळत असतानाच, २०१८ ते २०२३ या कालावधीत सौ. चिकणे गांजे गावाच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या. स्थानिक सर्व विरोधकांचा पराभव करत त्यांनी तब्बल ८० टक्के मतदान मिळवून विश्वास संपादन केला.
सरपंच काळात त्यांनी ग्रामपंचायतीच्या नावावर सात दस्त नोंदवून त्या जागांवर पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल, अंगणवाड्या, पाण्याच्या टाक्या, तसेच स्वतःची गावठाणातील जागा विनामूल्य ग्रामपंचायतीस देऊन कार्यालय उभारले.
शाळा व हायस्कूलसाठी डांबरी रस्ते, संरक्षण भिंती, सार्वजनिक व अपंग शौचालये, सभामंडप, विहिरींवर आडवे बोअर, मोठी पाणी टाकी उभारून प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा, पीएसी उपकेंद्र दुरुस्ती, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बंधाऱ्यांची दुरुस्ती, ओढ्यांवर धोबी घाट, वस्त्यांकडे सिमेंट रस्ते आदी कामे विविध निधीतून यशस्वीरीत्या केली.
विशेष म्हणजे, सरपंच कालावधीत एकही वाद पोलीस ठाण्यापर्यंत न नेता तंटामुक्ती समितीमार्फत गावातच प्रश्न सोडवण्यात आले, याची आजही गावकरी आवर्जून दखल घेतात.
महिलांच्या सक्षमीकरणाची चळवळ
महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेत लक्ष्मीताईंनी १०० हून अधिक बचतगटांची स्थापना केली. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता व कुटुंब समुपदेशन अशा विविध क्षेत्रांत त्यांनी उपक्रम राबवले. बचतगटांच्या माध्यमातून हजारो महिलांना एकत्र आणत स्वावलंबनाची चळवळ उभी राहिली.
वाहिन्यांच्या माध्यमातून महिलांना टेलरिंग मशीन, स्वसंरक्षण प्रशिक्षण, तसेच मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या.
कोरोना काळातील संवेदनशील सेवा
कोरोना महामारीच्या काळात लक्ष्मीताईंनी श्रीमंत-गरीब असा भेद न करता गरजू रुग्णांना औषधे, जेवण व राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली. हा सेवाभाव आजही जनतेच्या मनात ठसठशीत आहे.
सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम
विद्यार्थ्यांना शालेय व क्रीडा साहित्य वाटप, मुलींसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा तसेच हनुमान जयंती, रथयात्रा, शिवजयंती यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्या पुढाकाराने यशस्वी झाले आहेत.
संघटनात्मक भूमिका
सौ. चिकणे भारतीय जनता पक्षाच्या आघाडीमध्ये सक्रिय असून, बचतगट व अनलूम संस्थेच्या माध्यमातून महिलांना सातत्याने मार्गदर्शन करत आहेत.
नागरिकांची भावना
कुसुंबी गणातील नागरिक म्हणतात,
> “लक्ष्मीताईंनी अनेक वर्षे महिलांसाठी, वृद्धांसाठी व विद्यार्थ्यांसाठी निःस्वार्थपणे काम केले आहे. नेतृत्व, संवेदनशीलता व प्रामाणिकपणा त्यांच्या अंगी आहे. पंचायत समितीत महिलांचे प्रभावी प्रतिनिधित्व त्या नक्कीच करू शकतात.”
यावर लक्ष्मीताईंनी प्रतिक्रिया देताना सांगितले,
> “कुसुंबी गणातील जनतेची सेवा करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. महिलांचे सक्षमीकरण, स्वच्छता, शिक्षण व समाजहिताचे कार्य हेच माझे ध्येय आहे.”
अनेक वर्षांच्या सामाजिक, बचतगट व संघटनात्मक कार्याच्या पार्श्वभूमीवर कुसुंबी गणातून माजी सरपंच सौ. लक्ष्मी चंद्रकांत चिकणे यांना पंचायत समिती निवडणुकीची संधी द्यावी, अशी एकमुखी मागणी नागरिक, महिला व कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्यांच्या रूपाने जावळी पंचायत समितीला एक संवेदनशील, कर्तबगार व सजग महिला प्रतिनिधी लाभेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
मेढा / जावली

Post a Comment