फलटण हादरले..! पहिल्या प्रियकर व नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराचा निघृण खून; लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे करून मृतदेहाची विल्हेवाट


फलटण : प्रेमसंबंधांच्या त्रिकोणातून फलटण तालुक्यात एक थरकाप उडवणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका महिलेच्या पहिल्या प्रियकराने तिच्या नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराचा अत्यंत अमानुषपणे खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या खुनानंतर मृतदेह लाकडे कापण्याच्या मशीनने तुकडे करून काही अवयव नदीत फेकून, उर्वरित मृतदेह शेतात पुरण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील सोमंथळी येथील सतीश ऊर्फ आप्पा दडस याचे १४ जानेवारी २०२५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्याच्यासोबत काम करणाऱ्या लखन बंडू बुधवाले व सतीश तुकाराम माने यांच्यासोबत भांडण झाले होते. या वादात संबंधित महिलेच्या नवऱ्याने सतीशच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले.

यानंतर उपचारासाठी दवाखान्यात नेतो असे सांगून त्याला विडणी येथील मांगोबामाळ परिसरात आणण्यात आले. मात्र, पुढे त्याला फलटण तालुक्यातील धुळदेव गावाच्या हद्दीतील भिवरकर वाडी येथे नेऊन पुन्हा डोक्यात दगड घालून निघृण मारहाण करण्यात आली.

या संपूर्ण कृत्यात लखन बंडू बुधवाले, सतीश तुकाराम माने व रेश्मा लखन बुधवाले यांचा थेट सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. खून केल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सतीश दडस याचा मृतदेह लाकडे कापण्याच्या मशीनने तुकडे केला. मुंडके, खांद्यापासून हात आणि गुडघ्यापासून पाय वेगळे करून हात, मुंडके व पाय निरा नदीत फेकून देण्यात आले, तर उर्वरित मृतदेह फलटण तालुक्यातील साठे गावातील एका शेतात गाळात पुरून ठेवण्यात आला, अशी कबुली संशयितांनी दिल्याचे सांगितले जात आहे.

या संतापजनक आणि अंगावर शहारे आणणाऱ्या गुन्ह्याचा तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या प्रकरणामुळे संपूर्ण फलटण तालुका हादरून गेला आहे.

न्यूज मराठी लाईव्ह 
फलटण / सातारा

Post a Comment

Previous Post Next Post