सातारा : सातारा जिल्ह्याच्या प्रगतीला नवे परिमाण देणारा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच जाहीर झाला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यासाठी तब्बल ११५ कोटींचा ‘सीट्रिपल आयटी’ (Center for Invention, Innovation, Incubation & Training) प्रकल्प मंजूर झाला आहे. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने केंद्र मंजुरीचे पत्र राज्य शासनाला पाठवले असून टाटा कंपनी आणि राज्य शासनाच्या संयुक्त सहकार्यातून सातारा येथे हे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र उभे राहणार आहे.
या निर्णयामुळे साताऱ्यातील युवकांना उद्योगक्षेत्राच्या गरजेनुसार आधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञानासह रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्राच्या मंजुरीसाठी सहकार्य केल्याबद्दल मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
▪️११५ कोटींची गुंतवणूक; टाटा टेक्नॉलॉजीकडून सर्वाधिक निधी
▪️साताऱ्यात उभारल्या जाणाऱ्या या केंद्रासाठी एकूण ११५ कोटी रुपये खर्च होणार असून,
▪️९७ कोटी ७५ लाख रुपये टाटा टेक्नॉलॉजीतर्फे,
▪️१७ कोटी २५ लाख रुपये राज्य शासनाकडून उपलब्ध होणार आहेत.
या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील उद्योगक्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळण्यास मदत होईल, तसेच नवउद्योगांना मोठे प्रोत्साहन मिळेल. एआय-आधारित जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणामुळे युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होणार आहेत.
दरवर्षी ३ हजार युवकांना प्रशिक्षण
टाटा टेक्नॉलॉजीच्या पत्रानुसार, नवीन ‘सी-ट्रिपल आयटी’ सेंटरमध्ये दरवर्षी ३ हजार युवकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात उद्योगपूरक वातावरण निर्माण होऊन स्थानिक पातळीवर स्टार्टअप्स, नवउद्योग, आयटी-संबंधित व्यवसायांना चालना मिळण्याची शक्यता आहे.
साताऱ्यातील आयटी विकासाला नवे पंख
नागेवाडी येथे आयटी पार्क उभारणीसाठीचा पाठपुरावा आधीच सुरू असून त्याची अधिसूचना काही दिवसांपूर्वीच जाहीर झाली आहे. आता ‘सीट्रिपल आयटी’ केंद्राची भर पडल्यामुळे सातारा जिल्ह्यात आयटी क्षेत्रातील मोठी झेप घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या प्रकल्पामुळे युवकांना आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण तर मिळेलच, पण साताऱ्याचे उद्योगक्षेत्रही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धात्मक होईल.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याबद्दल सातारा जिल्ह्यातून समाधान व्यक्त होत असून, युवकांसाठी ही ऐतिहासिक उपलब्धी मानली जात आहे.
न्युज मराठी लाईव्ह
सातारा

Post a Comment