जिजाऊ संस्था व जावली महाबळेश्वर प्रतिष्ठानचा मोफत वह्या व चष्मा वाटप उपक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न

प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी

 मेढा (जावली) : जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आणि दि ग्रेट जावली महाबळेश्वर प्रतिष्ठान या दोन प्रतिष्ठित सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप तसेच नागरिकांसाठी नेत्रतपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात नुकतेच पार पडले.

हा उपक्रम कै. अण्णासाहेब पाटील माध्यमिक विद्यालय, पंचक्रोशी म्हाते बुद्रुक ता. जावली येथे भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. म्हाते बुद्रुक हायस्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा – म्हाते खुर्द, बुद्रुक, म्हाते मरा, गोंदेमाळ, वाघदरे, भामघर, गाळदेव तसेच श्री भैरवनाथ विद्यालय केळघर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळघर अशा विविध शाळांमधील जवळपास ५०० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले.

याचसोबत म्हाते पंचक्रोशी तसेच केळघर पंचक्रोशीतील सुमारे १५० गरजूंनी नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटपाचा लाभ घेतला.
शिक्षणाचा प्रकाश आणि आरोग्याचा उजेड—हे दोन्ही महत्वाचे दिवे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावेत, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.

दि ग्रेट जावली महाबळेश्वर प्रतिष्ठानचे आधारस्तंभ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे तसेच जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या प्रेरणेतून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. समाजाभिमुख कामाची ही परंपरा या कार्यक्रमाद्वारे अधिक बळकट होताना दिसली.

या प्रसंगी म्हाते खुर्दचे सरपंच श्री. राजाराम दळवी यांनी म्हाते पंचक्रोशीतील प्रमुख गरजा स्पष्टपणे मांडत, संकटकाळात तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकेची तसेच जावली तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी तालुका ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंदाची गरज अधोरेखित केली.

यावर प्रतिसाद देताना जिजाऊ संस्थेचे ठाणे शहरप्रमुख परेश कारंडे यांनी, “या सर्व मागण्यांवर सकारात्मक पावले उचलण्यात येतील आणि जिजाऊ संस्थेचे कार्य सातारा जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा आमचा संकल्प दृढ आहे,” अशी भावना व्यक्त केली.

सातारा जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांनीही मेढा येथे आधुनिक सुविधांनी सज्ज असे स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्यासाठी लवकरच ना. एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पुढाकार घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

कार्यक्रमास सातारा जिल्हा शिवसेना सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे दि ग्रेट जावळी महाबळेश्वर प्रतिष्ठान ठाणे अध्यक्ष शंकर दळवी,जिजाऊ सामाजिक संस्थेचे ठाणे शहरप्रमुख परेश कारंडे दि ग्रेट जावळी महाबळेश्वर प्रतिष्ठान ठाणे सेक्रेटरी विकास दळवी, नवयुग पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सखाराम दळवी, मनोहर दळवी, संचालक वसंत दळवी, जावली बँकेचे माजी संचालक, अभयलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष आनंदराव सपकाळ, वेण्णा निरंजन पतसंस्थेचे संचालक विनोद शिंगटे म्हाते खुर्दचे सरपंच राजाराम दळवी जावळी महाबळेश्वर कृषी बाजार समिती संचालक हणमंत शिंगटे निवृत्त तालुका विस्तार अधिकारी रघुनाथ दळवी,उत्कर्ष मंडळाचे माजी अध्यक्ष दत्ता सपकाळ,पत्रकार संदीप गाडवे, रघुनाथ पार्टे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गाडवे,म्हाते हायस्कूलचे मुख्याध्यापक भिसे, केळघर हायस्कूलचे मुख्याध्यापक जाधव, तसेच परिसरातील अनेक शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.

शिक्षण व आरोग्य या दोन महत्वाच्या क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडविणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

न्युज मराठी लाईव्ह 
मेढा / जावली 

Post a Comment

Previous Post Next Post