श्रमधाम संकल्पनेचा विचारांचा पाईक हरपला…! बांधकाम क्षेत्रात दुःखाचा महासागर; विनोद वाघमारे यांचे दुःखद निधन

प्रतिनिधी / राहुल पवार

कराड : अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. प्रत्येकाचे स्वप्न असते की आपले स्वतःचे घर असावे. या स्वप्नांना प्रत्यक्ष आकार देताना केवळ बांधकामच नव्हे, तर नातीही जपणारे वडोली निळेश्वर (ता. कराड) येथील प्रथितयश बांधकाम व्यावसायिक विनोद वाघमारे यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने कराडसह सातारा जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला असून समाजमन हळहळ व्यक्त करत आहे.

विनोद वाघमारे हे केवळ यशस्वी व्यावसायिक नव्हते, तर माणुसकी, नातेसंबंध आणि सामाजिक जाणीव जपणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. “माणूस पैसा, संपत्ती, सोने-चांदी किंवा मालमत्तेने मोठा होत नाही, तर नात्यांच्या उबदार स्पर्शाने खऱ्या अर्थाने श्रीमंत होतो,” या विचारावर ते ठाम होते. बदलत्या जीवनशैलीत तुटत चाललेल्या नात्यांविषयी ते नेहमी चिंतन मांडत आणि युवा पिढीला एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व समजावून सांगत.

पूर्वी घरे लहान असली तरी मने मोठी होती, आज साधने वाढली तरी संवाद कमी झाला आहे, मोबाईल आणि इंटरनेटमुळे जवळचे माणसेही दूर गेल्यासारखी वाटतात—या सामाजिक वास्तवावर ते नेहमी भाष्य करत. वृद्ध आई-वडिलांचा आधार, कुटुंबातील सण-समारंभातील आपुलकी, मैत्रीतील निःस्वार्थ साथ ही मूल्ये जपण्याचा त्यांचा आग्रह होता.

बांधकाम व्यवसायात “श्रमधाम” संकल्पनेतून कामगारांचा सन्मान, सुरक्षितता आणि माणुसकी जपण्याचा त्यांचा प्रयत्न अनेकांना प्रेरणादायी ठरला. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पाईक म्हणून त्यांनी समाजात समतेचा, माणुसकीचा आणि बंधुभावाचा संदेश दिला.

त्यांच्या अकाली निधनाने गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. नातेवाईक, मित्रपरिवार, सहकारी, कामगार आणि नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांची आणि कार्याची उब समाजमनात कायम राहील, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

माणूस यशाने नाही, तर नात्यांच्या उबदार स्पर्शाने खराखुरा श्रीमंत होतो—हा संदेश देणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असून त्यांच्या गोड आठवणी मात्र कायम स्मरणात राहतील.


न्यूज मराठी लाईव्ह
कराड / सातारा

Post a Comment

Previous Post Next Post