प्रतिनिधी / राहुल पवार
‘नाईट लाईफ’च्या नावाखाली संस्कृतीचा ऱ्हास की पर्यटनाचा विकास – गंभीर प्रश्न उपस्थित
गोवा : जगाला ज्ञान, संस्कार आणि अध्यात्माची दिशा देणाऱ्या भारतीय संस्कृतीवर आज पाश्चात्य चंगळवादी संस्कृतीचे अतिक्रमण होत असल्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. निसर्गसंपन्न, शांत आणि सांस्कृतिक वारसा जपणारे छोटे राज्य म्हणून ओळख असलेल्या गोव्यात ‘नाईट लाईफ’च्या नावाखाली सुरू असलेल्या उद्योगामुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतिक अधःपतन होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्सबारवर घातलेली बंदी अनेकांनी स्वागतार्ह मानली होती. मात्र, पर्यटन राज्य असलेल्या गोव्यात आज विविध फेस्टिव्हल्स आणि मनोरंजनाच्या नावाखाली नवी, वादग्रस्त संस्कृती रुजवली जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काही दिवसांपूर्वी गोव्यातील आरपोरा (हडपडे) गावात लागलेल्या भीषण आगीत तब्बल २५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विनापरवाना व्यवसाय, प्रदूषण नियमांचे उल्लंघन, बेकायदेशीर बांधकामे, माफियांचे जाळे, भ्रष्टाचार आणि प्रशासकीय अपयश यावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. मात्र, या सगळ्यामागे असलेल्या ‘नाईट लाईफ’ संस्कृतीवर फारशी चर्चा झाली नसल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे.
‘नाईट लाईफ’ म्हणजे दशावतारी नाटक, कीर्तन किंवा सांस्कृतिक जागरण नव्हे, तर रात्री-अपरात्री चालणारे मद्य, नशा, उत्तान नृत्य आणि चंगळवादाचे प्रदर्शन असल्याचा आरोप केला जात आहे. अशा ठिकाणी कोणताही सभ्य नागरिक आपल्या कुटुंबासह जाण्याचे धाडस करेल का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबतही गंभीर शंका व्यक्त केल्या जात आहेत.
या मनोरंजनाच्या केंद्रांमध्ये महिलांचे होणारे शोषण, त्यांचे वस्तूकरण, तसेच नशेचे वाढते प्रमाण याचा परिणाम केवळ पर्यटकांपुरता मर्यादित न राहता स्थानिक समाजावरही होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ड्रग्जचे व्यसन शालेय वयातील मुलांपर्यंत पोहोचत असल्याची उदाहरणे समोर आली आहेत. यामुळे मारामारी, गुन्हेगारी, लैंगिक अत्याचार यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची भीती व्यक्त होत आहे.
पर्यटनामुळे रोजगार आणि आर्थिक लाभ मिळत असले तरी, त्यासाठी समाज कोणती किंमत मोजत आहे, हा मूलभूत प्रश्न आहे. सांस्कृतिक ऱ्हास, नैतिक अधःपतन आणि भावी पिढ्यांवर होणारे दुष्परिणाम याकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप होत आहे.
यासाठी केवळ सरकार, पोलीस किंवा प्रशासनालाच जबाबदार धरून चालणार नाही, तर अशा क्लब्ससाठी जागा देणारे, त्यात काम करणारे, तसेच आर्थिक फायद्यासाठी मौन बाळगणारे स्थानिक घटकही तितकेच जबाबदार असल्याचे मत मांडले जात आहे.
‘नाईट लाईफ’च्या नावाखाली सुरू असलेले प्रकार हे अधर्माचे स्वरूप असून, रोजगाराच्या नावाखाली अशा कृत्यांत थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग पाप असल्याची भावना व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा संत तुकोबाराय यांसारख्या थोर विभूती असत्या, तर त्यांनी असा सांस्कृतिक ऱ्हास सहन केला असता का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
गोवामुक्ती दिनाच्या निमित्ताने, चंगळवादी संस्कृतीला आळा घालून शील, संस्कार आणि सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे. जीवन चंगळीसाठी नव्हे, तर मूल्यांसाठी जगावे, हा संदेश या चर्चेतून पुढे येत आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
पणजी / गोवा

Post a Comment