कुडाळ : जावली तालुक्यातील कुडाळ परिसरात फुलेनगर, पानस येथे सोमवारी मध्यरात्री सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सात ते आठ दरोडेखोरांनी एकामागून एक घरे लक्ष्य करत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेत दरोडेखोरांना प्रतिकार करत असताना धनश्री तानाजी कदम या महिलेवर चाकूने वार करण्यात आला असून त्या जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे बाराच्या सुमारास कुडाळ जवळील पुनर्वसित पानस गावात चोरट्यांनी प्रथम बंद घर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीही हाती न लागल्याने त्यांनी कुडाळचे उपसरपंच सोमनाथ कदम यांच्या शेतातील घराचा कडी-कोयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. तेथेही अपयश आल्यावर दरोडेखोरांनी जवळच असलेल्या तानाजी विठ्ठल कदम यांच्या घराकडे मोर्चा वळवला.
त्या वेळी घरात तानाजी कदम, त्यांची पत्नी धनश्री व मुलगी उपस्थित होत्या. दरोडेखोरांनी सुरुवातीला दरवाजा ठोठावून उघडण्याचा प्रयत्न केला. आतून “कोण आहे?” अशी विचारणा होताच त्यांनी दरवाजाला लाथा मारत तोडण्याचा प्रयत्न सुरू केला. दरवाजा कोसळण्याच्या बेतात असताना धनश्री कदम यांनी तो रोखण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान तानाजी कदम यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्यासाठी फावडे हातात घेतले. हे पाहून दरोडेखोरांनी थेट धनश्री कदम यांच्यावर हल्ला चढवत त्यांच्या हातावर चाकूने वार केला.
दरम्यान, तानाजी कदम यांच्या मुलीने शेजाऱ्यांना फोन करून मदतीसाठी बोलावल्याचे दरोडेखोरांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी धनश्री कदम यांच्यावर सोमर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच मेढा पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने घटनास्थळी भेट दिली. मात्र या संपूर्ण प्रकारामुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सशस्त्र दरोड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना, जखमी महिलेला तातडीने उपचार मिळवण्यासाठी आणि गुन्हा नोंदवण्यासाठी मेढा पोलीस ठाण्यापर्यंत धावपळ करावी लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून कुडाळ पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) पद रिक्त असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. सक्षम अधिकाऱ्याअभावी येथे गुन्ह्यांची नोंदच होत नसल्याने जनतेची मोठी गैरसोय होत आहे. मागील काही वर्षांपासून कुडाळ परिसरात सातत्याने घरफोडीच्या घटना घडत असून अद्याप एकाही चोरीचा छडा लागलेला नाही. पूर्वी बंद घरे लक्ष्य करणारे चोरटे आता थेट कुटुंबांवर सशस्त्र हल्ले करू लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर जावली तालुक्यातील पोलीस दलाच्या कार्यक्षमतेची व सुरक्षिततेची तातडीने सखोल चौकशी करून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणे, चौका-चौकात सीसीटीव्ही बसवणे, ग्रामपंचायतीच्या वतीने गस्त वाढवणे आणि पोलिसांनी पेट्रोलिंगच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणीही नागरिक करत आहेत.
न्यूज मराठी लाईव्ह
कुडाळ / जावली

Post a Comment