प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी
मेढा : जावली तालुक्यातील गवडी येथील जिल्हा परिषद आदर्श शाळेने आपल्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत तालुकास्तरीय बालनाट्य स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. “आधी लगीन कोंढाण्याचं” या प्रभावी ऐतिहासिक बालनाट्याच्या सादरीकरणातून आदर्श शाळा गवडीने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या नाट्यप्रयोगातून इतिहासाची सखोल जाण, प्रसंगानुरूप प्रभावी अभिनय, धारदार संवादफेक, शौर्य, धाडस, पराक्रम आणि संघभावना यांचे उत्कृष्ट दर्शन घडले. भावनिक आणि प्रेरणादायी प्रसंगांनी नटलेले हे सादरीकरण प्रेक्षकांच्या मनाला भिडले असून उपस्थितांकडून विद्यार्थ्यांना भरभरून दाद मिळाली.
या यशाबद्दल जावलीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, शिक्षण विस्तार अधिकारी मिलन मुळे, केंद्रप्रमुख वंदना गंगावणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंकुश गोळे, उपाध्यक्षा भाग्यश्री धनावडे व सर्व सदस्य, सरपंच राजेंद्र खुडे व ग्रामपंचायत गवडीचे सर्व सदस्य, श्री चवणेश्वर प्रतिष्ठाण गवडी तसेच ग्रामस्थ व विविध मंडळांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनापासून कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा देत नाट्यसादरीकरणासाठी मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक किरण ढेबे, उपशिक्षिका नेहा जाधव व मंगल शेलार यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
उल्लेखनीय बाब म्हणजे, याच शाळेच्या बालचमूने यापूर्वी तालुकास्तरीय गीतमंच स्पर्धेतही उत्कृष्ट सादरीकरण केले होते. गवडी शाळा सातत्याने शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असल्याने या यशाकडे संपूर्ण तालुक्यातून कौतुकाने पाहिले जात आहे.
न्युज मराठी लाईव्ह
मेढा / जावली

Post a Comment