कडेगाव पोलीस ठाण्यात पोलीस पाटील दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी / श्री.अनिल मोरे

कराड : कडेगाव पोलीस ठाण्यात पोलीस पाटील दिन मोठ्या उत्साहात व सकारात्मक वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास सहायक पोलीस निरीक्षक कोकाटे साहेब, गोपनीय विभागाचे मुल्ला सर, शिंदे मॅडम तसेच तालुक्यातील सर्व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी ॲड.उषा मिशाळ वायदंडे यांनी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ अंतर्गत असलेल्या १८ महत्त्वाच्या कायदेशीर कलमांची सविस्तर व सोप्या भाषेत माहिती दिली. पोलीस पाटील यांनी गावपातळीवर कोणकोणते रजिस्टर ठेवणे आवश्यक आहे, तसेच विविध शासननिर्देशित समित्यांमध्ये पोलीस पाटील यांची नेमकी भूमिका काय असावी, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यासोबतच सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे पोलीस पाटील संदर्भातील महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.

कार्यक्रमात अनेक पोलीस पाटील यांनी आपले अनुभव, अडचणी व सूचना मांडत मनोगत व्यक्त केले. यामध्ये रेखाताई दुबिले, नीलम लोंढे, चन्ने पाटील, नितीन पाटील यांच्यासह इतर पोलीस पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला.

हा कार्यक्रम पोलीस पाटील यांच्या कायदेशीर जबाबदाऱ्या, सामाजिक भूमिका आणि प्रशासनातील महत्त्व अधोरेखित करणारा ठरला. गावपातळीवरील शांतता, सुव्यवस्था व कायद्याची अंमलबजावणी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे उपस्थितांनी नमूद केले.


न्युज मराठी लाईव्ह 
कराड / सातारा

Post a Comment

Previous Post Next Post