प्रतापगड कारखान्याचा ऊस दर जाहीर; प्रती टन एकरकमी ३३५० रुपये


सातारा : जावली तालुक्यातील अजिंक्यतारा–प्रतापगड साखर उद्योग संचलित प्रतापगड सहकारी साखर कारखान्याने सन २०२५–२६ या गळीत हंगामासाठी ऊस दर जाहीर केला असून, गाळपास येणाऱ्या उसाला प्रती मे. टन एकरकमी ३३५० रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आल्याची माहिती अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे यांनी दिली.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा कारखान्याच्या सहकार्याने बंद पडलेला प्रतापगड साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यात आला. सन २०२३–२४ आणि २०२४–२५ हे दोन्ही गळीत हंगाम ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व कामगारांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले. सदर हंगामातील ऊसाचे पेमेंट वेळेत अदा केल्याने कारखान्याने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे.

सन २०२५–२६ चा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू असून आतापर्यंत ४० दिवसांत ८५ हजार ३४० मे. टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. सरासरी ९.८४ टक्के साखर उताऱ्याने ८१ हजार ०५० क्विंटल साखर पोती उत्पादन झाले आहे. या पार्श्वभूमीवर गाळपास येणाऱ्या उसाला प्रती टन एकरकमी ३३५० रुपये दर देण्याचा निर्णय अजिंक्यतारा–प्रतापगड उद्योग व्यवस्थापनाने घेतला आहे.

या हंगामात ३.५० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ते साध्य करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्यास गाळपासाठी पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन दोन्ही कारखान्यांच्या व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी प्रतापगड साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, अजिंक्यतारा कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव सावंत, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते तसेच अधिकारी उपस्थित होते.

न्युज मराठी लाईव्ह 
सातारा / जावली

Post a Comment

Previous Post Next Post