प्रतिनिधी / श्री.बजरंग चौधरी
जावली : तालुक्यातील मौजे तळोशी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ‘अॅनिमिया मुक्त भारत’ कॅम्पचे आयोजन करण्यात आले. आरोग्य उपकेंद्र केडंबे यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या या उपक्रमात १८ वर्षांवरील सर्व महिलांची हिमोग्लोबिन, रक्तदाब, मधुमेह व कॅन्सर तपासणी करण्यात आली.
या आरोग्य उपक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत तळोशी, अंगणवाडी सेविका, आरोग्य उपकेंद्र केडंबे आणि आशा सेविका यांच्या संयुक्त विद्यमाने झाले. अंगणवाडी व आशा सेविकांनी महिलांच्या घरोघरी जाऊन केलेल्या जनजागृतीमुळे कॅम्पला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला.
केडंबे उपकेंद्रातील कम्युनिटी हेल्थ ऑफिसर सुप्रिया मुळे यांनी महिलांना संतुलित आहार, रक्तातील हिमोग्लोबिनचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आढळले, त्या महिलांना फॉलिक अॅसिडच्या गोळ्या देण्यात आल्या. “ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महिलांचे आरोग्य मजबूत राहणे अत्यंत आवश्यक आहे,” असे मतही त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात प्रकाश भोंडे (आरोग्य सेवक), तेजल धनावडे (लॅब टेक्निशियन), मेघा पाटकर (आरोग्य सेविका), अमर शेडगे (आरोग्य सहायक) यांसह ग्रामपंचायतीतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सरपंच सौ. वनिता बैलकर, उपसरपंच सौ. मंगल बैलकर, सदस्या संगिता चिकणे, लिलाबाई चिकणे, ग्रामपंचायत अधिकारी सौ. अपर्णा जाधव, अंगणवाडी सेविका सौ. निर्मला चिकणे व आशा सेविका सौ. सुनिता चिकणे, तसेच आनंदा चिकणे व बाजीराव बैलकर यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
ग्रामस्थ आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कॅम्प यशस्वी केला. तळोशी ग्रामस्थांनी यापूर्वीही अनेक अभियान यशस्वीपणे राबविल्याचे नमूद करत, हे अभियानही प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, तसेच आरोग्य उपकेंद्र केडंबेचे सहकार्य कायम राहील, असा विश्वास सरपंच सौ. वनिता बैलकर यांनी व्यक्त केला.
न्यूज मराठी लाईव्ह
जावली / सातारा

टिप्पणी पोस्ट करा