प्रतिनिधी / श्री.अनिल मोरे
सातारा: कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत मुख्यत्वे भाजप, काँग्रेस आणि शिंदे शिवसेना पक्षात नगराध्यक्षपदासाठी लढत होत आहे. भाजपाचे उमेदवार अण्णा पावसकर, काँग्रेसचे उमेदवार झाकीर पठाण आणि शिंदे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांच्यात नगराध्यक्षपदासाठी लढत होणार असून ही निवडणुक तिहेरी आणि रंगतदार होणार आहे.
विशेष करून भाजप आणि शिंदे शिवसेना यांची थेट लढत होणार असल्याचे दिसते. याचे कारण म्हणजे यादव हे अनेक वर्षांपासून कराड नगरपालिकेच्या राजकारणात आहेत. आणि भाजपचे उमेदवार अण्णा पावसकर हे पूर्वी नगराध्यक्ष होते. राजेंद्रसिंह यादव हे सर्वधर्म समभाव मानणारे नेते असल्यामुळे व त्यांचा युवकांशी थेट संपर्क असल्याने यादव यांना कराडच्या मतदारांचा पाठींबा असल्याचे दिसत आहे.
काँग्रेसचे उमेदवार पठाण हे बहुजनांचा चेहरा असले तरी त्यांच्यामागे जनमत दिसत नाही, ते कराडकरांना जास्त माहीत नाहीत. या पार्श्वभूमीवर राजेंद्रसिंह यादव यांचाच बोलबोला नगराध्यक्षपदासाठी होत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार, माजी उपनगराध्यक्ष आणि यशवंत विकास आघाडीचे राजेंद्र सिंह यादव यांनी गेल्या काही वर्षांत कराडमध्ये आपला जम बसवला आहे. सर्वसामान्यांशी थेट ओळख, जनतेत मिळून मिसळून काम करण्याची सवय त्यांची लोकप्रियता वाढविण्यास कारणीभूत ठरले.
तर भाजपाचे अधिकृत उमेदवार अण्णा पावस्कर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आहेत. कराडात संघाच्या शाखा वाढविण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे. ते माजी नगराध्यक्षही आहेत. त्यामुळे भाजपने त्यांचेच नगराध्यक्ष पदाचे तिकीट पक्के केले. काँग्रेसचे उमेदवार पठाण हे नव्या मतदारांना कितपत माहीत आहेत, हा प्रश्न आहे. पठाण बहुजन समजतील आहेत हे खरे, परंतु त्यांचा प्रभाव किती पडणार, याबद्दल शंका आहे. या राजकीय विश्लेषणानुसार, राजेंद्रसिंह यादव यांचे पारडे जड आहे, असे दिसते.
राजेंद्र सिंह यादव हे यशवंत विचारांचा वारसा जोपासणारे तसेच पुरोगामी विचारांचे नेते असून ते शिंदे शिवसेनेत असले तरी मतदान करताना मतदार यादव यांच्याच बाजूने जाईल, असे दिसते. स्व. बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवून ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धर्तीवर चालणारे यादव कराडचे विकासाभिमुख दमदार नेतृत्व म्हणून अनेक वर्षापासून सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये यशस्वीरित्या काम करत आहेत. शहरासह खेड्यापाड्यातील युवकांबरोबर त्यांचा असणारा दांडगा संपर्क आणि संघटन कौशल्याचा गुण दुर्लक्ष करून चालणार नाही.
नेहमीच जातीवादापासून दूर राहणारा आणि सर्व जाती धर्माच्या लोकांच्या हातात हात घालून सर्वधर्मसमभावाचा विचार जोपासणारा नेता म्हणून सातारा जिल्ह्यात यादव यांची ओळख आहे.
राजेंद्रसिंह यादव यांच्या संपर्कामुळे त्यांच्याजवळ हिंदू कार्यकर्ते आहेतच, पण मोठ्या प्रमाणात मुस्लिम,आणि बौद्ध समाजातील लोकांचा व कार्यकर्त्यांचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठींबा असल्याचे दिसत आहे. निधर्मी नेता म्हणून त्यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून येण्यास कोणती अडचण भासणार नाही. भाजपचे कराडचे नेते अण्णा पावसकर ( विनायक पावसकर ) हे भाजपचे कट्टर हिंदुत्ववादी आहेत.
त्यांनी नगरपालिका निवडणुकीपूर्वी शहरातील नागरिकांसाठी अनेक विनामूल्य योजना सुरू केल्या आहेत. जसे की, सिंदूर हेल्थ कार्ड, अण्णा पावस्कर हेल्थ कार्ड आणि विनामूल्य फिरता दवाखाना. अण्णा पावसकर हे नगराध्यक्ष पदाची लढाई लढत आहेत. त्यांना मतदारांचा पाठींबा कितपत मिळतो, हे पहावे लागेल. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रभाव दिसत नाही. तसेच महायुतीचे दोन उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे महायुतीच्या मतांची विभागणी होणार असल्याचे दिसत आहे.
भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत !
कराड नगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काही महीने भाजपचे कराड दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याकडे भाजपा पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना नगरपालिका निवडणुकीपूर्वी आमदार डॉ. भोसले यांनी शहरातील अनेक स्थानिक दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये आणले, पक्षांतर घडवले. त्यापैकी माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव, अरुण जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यावर राजकीय चित्र पालटेल, अशी आशा होती. परंतु कराड नगराध्यक्ष पदासाठी थेट वरीष्ठ पातळीवरून अण्णा (विनायक ) पावसकरांना भाजपचे तिकीट मिळाले. त्यामुळे आता शिंदे शिवसेना पक्षाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांच्याशी पावसकर यांची थेट लढत होणार असल्याचे दिसते.
भाजपला नगराध्यक्ष पदापासून दूर करण्याची खेळी
शिंदे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचे समजते. या भेटीदरम्यानची चर्चा गुलदस्त्यात आहे. परंतु नगराध्यक्ष पदापासून भाजपला बाजूला करायचे असेल तर, शिंदे शिवसेना पक्षाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांना पाठींबा देण्यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादी पक्ष तयार झाले असल्याची चर्चा शहरभर रंगत आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
कराड / सातारा

Post a Comment