राज्यातील १०३ रस्ते व पुलांसाठी १६८८ कोटींचा निधी साताऱ्यातील १५ कामांसाठी २०१ कोटींचा ‘बूस्टर डोस’ — ना. शिवेंद्रसिंहराजे

 

सातारा : राज्यातील रस्ते सुविधा अधिक सक्षम व सुरक्षित करण्यासाठी मोठा आर्थिक पुरवठा जाहीर झाला असून, केंद्रीय रस्ते निधीमधून राज्यातील १०३ रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी तब्बल १६८८ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. यापैकी सातारा जिल्ह्यातील १५ महत्वाच्या कामांसाठी २०१.५ कोटी रुपये निधी मंजूर झाला असून, हा जिल्ह्यासाठी “बूस्टर डोस” ठरणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. निधी मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

राज्यभरातील पायाभूत सुविधांना चालना

ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी राज्यातील रस्त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यानंतर राज्यातील १०३ कामांसाठी १६८८ कोटींचा भरीव निधी केंद्राकडून उपलब्ध झाला. या निधीमुळे अनेक जिल्ह्यांतील प्रमुख रस्ते रुंदीकरण, मजबुतीकरण आणि पूल बांधकामांना गती मिळणार आहे.

साताऱ्यासाठी २०१.५ कोटींची मोठी भर

सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील १५ महत्वाच्या रस्त्यांसाठी हा निधी वापरला जाणार असून, यात प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, मजबुतीकरण आणि आवश्यक तेथे मोठ्या पुलांचे बांधकाम यांचा समावेश आहे. या निधीमुळे जिल्ह्यातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत होतील आणि वाहतूक व्यवस्थेत सुरक्षितता व सुगमता येईल, असा विश्वास ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केला.

कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश

मंजूर सर्व कामांच्या निविदा प्रक्रिया, मंजुरी आणि इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून लगेच कामे सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

“कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजेत,” असे स्पष्ट निर्देशही ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले.

राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने आगामी काळात जिल्ह्यातील प्रमुख राज्यमार्ग, जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्गांचे आधुनिकीकरण प्राधान्याने केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.


न्यूज मराठी लाईव्ह 

सातारा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने