प्रतिनिधी / राहुल पवार
कराड (सातारा)
पणजी (गोवा) : आधुनिक इंटरनेटच्या जगात युवा पिढी मोबाईल, व्हाट्सॲप आणि सोशल मीडियामध्ये रमून गेल्याची सर्वसाधारण धारणा असताना, वाचन संस्कृतीकडे असलेले युवकांचे दुर्लक्ष चिंतेचा विषय बनला आहे. मात्र, याला अपवाद ठरवत गोव्याची नवोदित लेखिका समीक्षा नागेश शेट शिरोडकर यांनी “विचाराचे झाड” या नावाच्या अनोख्या साहित्य संकल्पनेद्वारे वाचन संस्कृती जागवण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे.
खेड्यातून शिक्षण घेत, कठीण परिस्थितीतून साहित्य प्रवास सुरू केलेल्या समीक्षाची वाटचाल थक्क करणारी आहे. ललित लेखन, अंतरंग लिखाण आणि समाजप्रबोधनात्मक विषयांवर विविध माध्यमांतून सलगपणे लिहित युवती म्हणून तिने साहित्य क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तिच्या याच कार्याची दखल घेत साहित्य अकादमीच्या प्रवास अनुदान योजनेसाठी यंदा तिची निवड झाली असून, या माध्यमातून तिला गुजरातमध्ये साहित्य अभ्यास व लेखनाची संधी मिळणार आहे.
नेहरू युवा केंद्रातून प्रेरणा घेतलेल्या समीक्षाने वाचन संस्कृती, लोकसंस्कृती, परंपरा, रुढी, सण-उत्सव आणि बदलत्या समाजप्रवाहांवर चिंतन करत कोकणी आणि मराठी भाषेत लेखनास प्रारंभ केला. तिचे “पुस्तकाची बाग, विचाराचे झाड” हे संकल्पनात्मक साहित्य निर्मितीसाठीचे प्रयत्न युवकांना वाचनाची प्रेरणा देणारे ठरत आहेत.
आजच्या डिजिटल युगात प्रत्यक्ष संवाद, भेटीगाठी, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक स्मृती हरवत चालल्या असताना, गावची लोकसंस्कृती जपण्याचा तिचा प्रयत्न उल्लेखनीय आहे. कोकणी व मराठी मधून उच्चशिक्षण घेतल्यानंतर बी.एड. करून मये येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या समीक्षाने विद्यार्थ्यांमध्ये वाचन आणि लेखन संस्कृती वाढीस लागण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे.
समीक्षाला गोवा राज्याचा सामाजिक पुरस्कारही प्राप्त झाला असून, सम्राट क्लब, नेहरू युवा केंद्र आदी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक वारसा पुढे नेण्याचा तिचा निर्धार अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. साहित्य अकादमीच्या अनुदानासाठी निवड झाल्यानंतर विविध स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.
सांस्कृतिक वारसा जपण्या सोबतच आधुनिकतेच्या प्रवाहात संतुलन राखत पुढे जाण्याचा संदेश तिच्या साहित्य प्रवासातून उमटतो. गोवा आणि महाराष्ट्रातील वाचन संस्कृती पुनर्जीवित करण्यासाठी तिचा हा प्रयत्न खरंच महत्वपूर्ण मानला जात आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
पणजी / गोवा

टिप्पणी पोस्ट करा