प्रतिनिधी / बजरंग चौधरी
सातारा (कास) : दि.१४ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या ऐन धामधुमीत राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाला महाबळेश्वर तालुक्यात मोठा झटका बसला असून महाबळेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष कारंडे यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून ते शनिवारी महाबळेश्वर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाची महाबळेश्वर तालुक्यातील कमी झाली असून शिवसेनेला मात्र मोठे बळ मिळणार आहे. सुभाष कारंडे हे तापोळा विभागातील एक सक्रिय नेतृत्व असून त्यांचा समाजकारण, राजकारण यात मोठा अनुभव आहे. १९८८ साली तापोळा येथे त्यांचे वडील लक्ष्मणराव कारंडे व चुलते रामचंद्र कारंडे यांनी विशाल बोट क्लब मागासवर्गीय सहकारी संस्थेची स्थापना करून कोयना जलाशयातील बोट व पर्यटन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर या संस्थेची धुरा सुभाष कारंडे यांनी समर्थपणे सांभाळत आपली समाजकारण चालू केले.
१९९५ साली आपल्या राजकारणाची सुरुवात तत्कालीन शिवसेना आमदार सदाशिवराव सपकाळ व तानाजी धुमाळ यांच्या नेतृत्वात करत चांगले कार्य केले त्यानंतर १९९९ साली राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर १९९९ साली त्यांनी शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते आतापर्यंत ते राष्ट्रवादीतच आहेत. राष्ट्रवादी पक्षात दोन गट झाल्यानंतरही त्यांनी पक्षाचे संस्थापक असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतच राहणे पसंत केले. परंतु सद्य परिस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोयना भागासह महाबळेश्वर तालुक्यात केलेल्या अनेक विकास कामांमुळे त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रवादी पक्षातून काम करत असताना मर्यादा येत असल्याने आवश्यक ते पाठबळ मिळत नसल्याने तापोळा विभागात सक्षम असलेल्या शिवसेना पक्षात जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांच्या ह्या निर्णयामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेला महाबळेश्वर तालुक्यात चांगलाच फायदा होणार आहे. त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कामही चांगले असून सरकार ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत.
सुभाष कारंडे यांची प्रतिक्रिया - माझ्या वैयक्तिक अडचणींमुळे मी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला असून दुर्गम तापोळा भागातील विकास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय मी घेतला आहे.
न्युज मराठी लाईव्ह
सातारा / कास

Post a Comment