म्हाते खुर्दमध्ये विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून वनराई बंधारा; ग्रामस्थ-शाळांची एकत्रित पर्यावरण चळवळ

प्रतिनिधी : बजरंग चौधरी


मेढा (जावली) : दि.१० जावली तालुक्यातील म्हाते खुर्द येथे पर्यावरणाच्या संवर्धन आणि जलसंधारणाचा संदेश केवळ पुस्तकांपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवत म्हाते खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेचे व म्हाते बुद्रुक येथील आण्णासाहेब पाटील हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि ग्रामस्थ यांनी एकत्र येत आज यशस्वीपणे वनराई बंधारा उभारला.

या लोकसहभागातून उभारलेल्या बंधाऱ्यामुळे पुढील चार महिने गावातील जनावरे, वन्यप्राणी तसेच पक्ष्यांना पाण्याचा मोठा आधार मिळणार आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या झळा कमी करण्यात या उपक्रमाचे मोलाचे योगदान ठरणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

या स्तुत्य उपक्रमात सरपंच राजाराम दळवी,अाण्णासाहेब पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री भिसे , श्री मनेर, सौ. भिलारे, सौ. गुरव, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. कणसे, निकम, श्री. बोरसे यांच्यासह शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

खडक, मातीच्या गोण्या, झाडांच्या फांद्या यांच्या सहाय्याने ओढ्यावर बांध घालण्यात आला. हा उपक्रम राबवताना विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते. “निसर्गासाठी काम करणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे,” अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

यावेळी ग्रामस्थांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशा पर्यावरणपूरक उपक्रमांत पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त केला. गावातील युवकांनीही पुढे येत अशा उपक्रमांसाठी कायम साथ देणार असल्याचा विश्वास दिला.

जलसंधारणाच्या या विधायक कामाने म्हाते खुर्द गावात एकजुटीची, पर्यावरणप्रेमाची आणि सामाजिक जबाबदारीची नवी प्रेरणा निर्माण केली आहे. निसर्गासाठी लहान हातांनी उचललेले हे पाऊल गावासाठी मोठा आधार ठरणार आहे.

पंचायत समिती जावलीचे गटविकास अधिकारी पाटील,विस्तार अधिकारी माने व ग्रामविकास अधिकारी सौ. दळवी यांचे मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत म्हाते खुर्द गावाने उचलले हे पाऊल अभियानाची शान वाढवणारी असल्याची भावना म्हाते खुर्द गावचे सुपूत्र पत्रकार विकास दळवी यांनी व्यक्त केली.



न्यूज मराठी लाईव्ह 
मेढा / जावली 

Post a Comment

Previous Post Next Post