Major Scam in Satara: राज्य सरकारने ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी 'लाडकी बहीण योजना' सुरू केली. या योजनेचे अनेक निकष लावण्यात आले होते. मात्र, निवडणुकीचे वातावरण असल्याने मतांच्या हव्यासापोटी महायुतीने महिला अर्जाची अधिकची चाचपणी न करता आलेल्या बहुतांश अर्ज पात्र ठरवीत निकषात बसविले.
सातारा : विधानसभेच्या तोंडावर सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेतील लाभार्थ्यांच्या फेर तपासणीत तब्बल ८४ हजार १३ महिला उत्पन्न मर्यादा ओलांडल्याने अपात्र ठरल्या आहेत. दीड हजार रुपये लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटींनुसार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेत असणे आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक शासकीय नोकरदार व अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांनी शासनाचा चुकीच्या पद्धतीने वर्षभरात तब्बल १५१ कोटींचा लाभ घेतल्याचे तपासात उघड झाले.
अनुदानाच्या निधीवर पहिला हक्क गरजूंचा असताना राजकीय लाभासाठी विधानसभेच्या तोंडावर सरसकट महिला योजनेचा लाभघेताना महायुतीचे 'तोंडावर बोट' होते. मात्र, कालांतराने या योजनेचा अडसर विकासकामे व इतर निधीवर झाल्याने सरकारने डोळ्यावरची झापडे उघडून योजनेची तपासणी करत अपात्र महिलांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे.
राज्य सरकारने ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी 'लाडकी बहीण योजना' सुरू केली. या योजनेचे अनेक निकष लावण्यात आले होते. मात्र, निवडणुकीचे वातावरण असल्याने मतांच्या हव्यासापोटी महायुतीने महिला अर्जाची अधिकची चाचपणी न करता आलेल्या बहुतांश अर्ज पात्र ठरवीत निकषात बसविले. त्यामुळे पात्र अर्जदारांच्या खात्यात दीड हजार रुपये पाठविणे क्रमप्राप्त ठरले होते. कालांतराने पात्र नसतानाही लाभ घेत असल्याची चर्चा गावच्या पारापासून विधानसभेपर्यंत ऐकू येऊ लागली. त्यातच सरकारचा सगळा पैसा लाडकी बहीण योजनेत जात असल्याने सरकारने छाननी करून अर्ज अपात्र करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात चूक महिलांची की सरकारची? हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे.
१२५ जणी स्वतःहून पडल्या बाहेर
लाडकी बहीण योजनेतील एकूण पात्र लाभार्थ्यांमधून जिल्ह्यातील १२५ महिलांनी शासनाची फसवणूक न करता स्वतःहून या यादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र, शासनाने आवाहन करूनही ८४ हजारांहून अधिक लाभार्थी पात्र नसताना देखील गैरफायदा घेत लाभघेतल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण सुरू आहे.
अर्ज अपात्र होण्याची कारणे
▪️संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला
▪️अन्य शासकीय योजनेचा लाभ
▪️नमो शेतकरी योजनेचा लाभ
▪️कुटुंबामध्ये चारचाकी वाहने
▪️अर्जदार २१ ते ६५ वयोगटात बसत नाहीत.
▪️सद्यःस्थितीत अर्जदाराचे वय ६५ वर्ष पूर्ण
▪️एका कुटुंबामध्ये जास्त महिला लाभ घेतात.
अशी आहे स्थिती..
▪️आठ लाख ३३ हजार २३७ जिल्ह्यात एकूण प्राप्त अर्जाची संख्या
▪️सात लाख ४९ हजार ९९ पात्र अर्जाची संख्या
▪️८४ हजार १३ अपात्र अर्जाची संख्या
▪️१५१ कोटी चुकीच्या पद्धतीने वर्षभरात घेतलेला लाभ
अपात्र महिलांनी घेतला लाभ
लाडकी बहीण योजना जून २०२४ मध्ये सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला दीड हजार लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होत होते. सद्यःस्थितीत या योजनेला वर्ष झाले आहे. जिल्ह्यात ८४ हजार १३ महिलांनी निकषात बसत नसतानाही लाभ घेतला असल्याने अपात्र असूनही या महिलांनी दीड हजाराप्रमाणे वर्षाची आकडेवारी काढल्यास १५१ कोटी २२ लाखांचा लाभ घेतला आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
सातारा

टिप्पणी पोस्ट करा