अरे, ही तर मीच! व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करताच तरुणीला दिसला स्वतःचा अश्लील VIDEO; नक्की घडलं काय?


कराड शहरात एका धक्कादायक घटनेत, एका महिला डॉक्टर आणि इतर दोन डॉक्टरांचे तसेच एका युवती व युवकाचे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील व्हिडिओ बनवण्यात आले. अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये हे व्हिडिओ प्रसारित केले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा सूत्रधार डॉक्टरच असल्याचा संशय आहे.


सातारा : कराड शहरातील महिला डॉक्टरसह दोन डॉक्टर व एका युवक -युवतीची एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील व्हिडीओ बनवल्याचे समोर आले आहे. हा व्हिडीओ परराज्यातून बनवून घेण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर म्हणून घेणाराच एक संशयित असल्याचे तपासात समोर आले आहे. याचा पोलिसांकडून तपास सुरू असून, संबंधित डॉक्टरकडे चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, कराड शहरात मागील महिन्यात 20 मे रोजी एका युवतीला एका अनोळखी व्यक्तीने व्हॉटस्ॲपवरील एका ग्रुपमध्ये समाविष्ट केले होते. त्या ग्रुपमध्ये 26 अन्य लोकांना समाविष्ट करण्यात आले होते. त्याच मध्यरात्री संबंधित व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर एक महिला डॉक्टर आणि या महिला डॉक्टरशी ओळखसुद्धा नसणाऱ्या अन्य एका डॉक्टरचे फोटो वापरून तयार केलेला अश्लील व्हिडीओ पोस्ट करण्यात आले होते. त्याच कालावधीत या ग्रुपवर दुसरा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात संबंधित तक्रारदार युवतीचा एका युवकासोबत अश्लील व्हिडीओ बनवल्याचे निदर्शनास आले.

हा व्हिडीओ बनविताना मजकूर, व्हिडीओला अश्लील भाषेतील आवाज सुद्धा जोडला होता. या धक्कादायक प्रकारानंतर संबंधित युवतीने माहिती घेत ज्यांचे अश्लील व्हिडीओ बनवले, त्या सर्वाना शोधून काढत याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

दरम्यान, पोलिसांकडून तपास सुरू असून, या प्रकरणाचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर म्हणून घेणाराच एक संशयित असल्याचे समोर आले आहे. परराज्यातून व्हिडीओ बनवून घेण्यासाठी त्याने पैसे दिल्याचे परराज्यातील संशयिताकडून पोलिसांना समजले आहे. त्याबरोबर संबंधिताचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. मात्र, याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे.


न्यूज मराठी लाईव्ह 
कराड / सातारा



Post a Comment

Previous Post Next Post