श्री.संजय वांगडे.
प्रतिनिधी / मेढा (जावली)
"शाळा म्हणजे फक्त इमारत नव्हे... ती असते स्वप्नांची पहिली पायरी... आणि त्या पायरीवर पहिलं पाऊल टाकणार आहेत लाडके चिमुकले!"
मेढा (जावली) : शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिलीच्या नवागतांचे स्वागतासाठी मेढ्याची पी. एम. श्री जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा सज्ज झाली असून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी व त्यांना भेटायला सातारा जावली मतदार संघाचे लोकप्रतिनिधी तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.श्री.शिवेंद्रराजे भोसले येणार असल्याने पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
येत्या १६ जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून, शिक्षण विभागाची जय्यत तयारी सुरू आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव राबविण्यात येणार असून, शाळांचा परिसर सजविण्यासोबत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत, प्रभातफेरी, पुस्तके तसेच गणवेश वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर एकही बालक शाळाबाह्य राहणार नाही याची काळजी घेतली जात असल्याची माहिती, शिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी दिली आहे.
जावली तालुक्यातील जिल्हा परिषद, तसेच अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके देण्यात येतात. ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळतील असे नियोजन करण्यात येत आहे. सरकारकडून पुस्तके प्राप्त झाली असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश मिळणार असून, ही पुस्तके तालुक्याच्या गटशिक्षण अधिकाऱ्यामार्फत केंद्रप्रमुख व केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात येत आहेत. जावलीत एकही शाळाबाह्य विद्यार्थी राहणार नाही या दृष्टीने शिक्षण विभागामार्फत पावले उचलण्यात येत आहेत.
१६ जून रोजी शाळा सुरू होणार आहेत. त्यापूर्वी ६ ते १४ वयोगटातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नये, यासाठी प्रवेश पात्र बालकांच्या याद्या ग्रामपंचायत व शाळा फलकावर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. प्रवेश पात्र बालकांची यादी लाऊडस्पीकरवर घोषित करून शैक्षणिक पदयात्रा व शिक्षकांच्या गृहभेटी व सरपंच, गावकरी, व्यवस्थापन समिती सदस्य, युवक, बचतगट, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वाच्या गृहभेटींचे नियोजन करण्यात
आले आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी स्वागत करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ना शिवेंद्रराजे भोसले, मा. नगराध्यक्ष पांडूरंग (बापू) जवळ,अनिल शिंदे, मा.उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार, नगरपंचायतीचे मा. नगरसेवक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक तोडकर, सचिन करंजेकर, केद्रप्रमुख मिलन मुळे , विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा मेढा येथे स्वागत करण्यात येणार आहे.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना पुष्प , शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात येणार आहे.शहरातून प्रभातफेरी काढण्यात येणार असून प्रभातफेरीत युवक, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिकांना प्रभातफेरीमध्ये सहभागी होण्याची विनंती शाळेच्या वतीने करण्यात येणार आहे. वर्षभर १०० टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची माहिती देणे तसेच एकही विद्यार्थी शाळेबाहेर राहणार नाही अशी उपस्थितांसह प्रतिज्ञा घेण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रंजना सपकाळ यांनी दिली आहे. या प्रवेशोत्सवानिमित्त सर्व पालक व ग्रामस्थ मेढा यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.
न्यूज मराठी लाईव्ह
मेढा / जावली