श्री.सुनील धनावडे
प्रतिनिधी / सातारा
सातारा : जावली तालुक्यातील सहकार क्षेत्राला प्रेरणादायी ठरावी अशी कामगिरी करत सरताळे विकास सेवा सोसायटीने सभासद पातळीवर सलग ३ वर्ष १०० टक्के कर्जवसुली करून ऐतिहासिक विक्रम करणारी जावळी तालुक्यातील पहिली संस्था ठरली आहे. तालुक्यात संस्था पातळीवर शंभर टक्के वसुलीची कामगिरी करण्याचा मान मिळाला आहे. या गौरवप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दस्तगीर शेख, उपाध्यक्ष सुनील भिसे, संचालक राजेंद्र पवार, सोमनाथ पवार, सलीम शेख तसेच संपूर्ण संचालक मंडळ, कर्जदार सभासद, व सचिव मनोज देशमाने यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
जावलीचे आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे , जावली तालुक्याचे सहाय्यक निबंधक जगताप साहेब, प्रतापगड कारखान्याचे संचालक आनंदराव जुनघरे आदी मान्यवरानी संस्थेच्या पारदर्शक व कार्यक्षम कारभाराचे कौतुक केले.जिल्हा बँकेचे विभागीय विकास अधिकारी आर एल निकम , विकास अधिकारी डी. व्ही. पार्टे, वसुली अधिकारी संजय निकम, बेलावडे सोसायटीचे सचिव अनिल ससाणे, शाखा प्रमुख गुरव साहेब, मानकुमरे मॅडम, तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील प्रामाणिक योगदानाची पावती देत, सरताळे विकास सेवा सोसायटीच्या या यशस्वी वाटचालीचा गौरव करण्यात आला. अशा प्रकारच्या शंभर टक्के वसुली करणाऱ्या संस्था ग्रामीण भागात शाश्वत आर्थिक सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण ठरत आहेत. सरताळे सोसायटीचा आदर्श इतर संस्थानी घ्यावा असे आवाहन जावळीचे सहायक निबंधक सुनिल वसंतराव जगताप यांनी केले.
न्युज मराठी लाईव्ह
सातारा