श्री.अनिल मोरे
प्रतिनिधी / कराड (सातारा)
कराड : सामाजिक भान जपत पत्रकारितेसह जनसेवेचे कार्य अविरतपणे करणारे कराड येथील ज्येष्ठ पत्रकार व आरोग्यिता चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शरद गाडे यांना महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा 'राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार' नुकताच सातारामध्ये सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
शरद गाडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत असतानाच, त्यांच्या आरोग्यिता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी हजारो गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवला आहे. कोरोना काळात त्यांनी अन्नदानाचे मोठे उपक्रम राबवले. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शूज, शालेय साहित्याचे वाटप, अंगणवाड्यांमध्ये उपयुक्त वस्तूंचे वितरण, अशा उपक्रमातून त्यांचे कार्य अधोरेखित होते.
शरद गाडे हे संविधान सन्मान, जनजागृती व प्रबोधन यासाठी सतत कार्यरत असून, विविध माहितीपट निर्मिती, अंध-अपंगांसाठी सेवा कार्य, आणि समाजप्रबोधनपर उपक्रम हे त्यांच्या कार्याचा अविभाज्य भाग ठरले आहेत.
सातारा येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सौ. प्रतिभाताई शेलार, सातारा जिल्हा कारागृहाचे पोलीस अधीक्षक मा. शमाकांत शेडगे, सातारा सत्र न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सयाजीराव घाडगे आणि संयुक्त सचिव वंदना संकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शरद गाडे यांच्या समाजकार्याची ही पावती म्हणजे सामाजिक भान असलेल्या पत्रकारितेच्या आणि माणुसकीच्या कार्याच्या उंचीची एक नोंद आहे.
न्युज मराठी लाईव्ह
कराड / सातारा