कलेक्टर ऑफिससमोर 22 तोळे दागिने लुटले, पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, आरोपींच्या 12 तासात नांग्या ठेचल्या; सातारा शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

कलेक्टर ऑफिससमोर एका कुरियर कर्मचाऱ्याकडून 22 तोळे दागिने लुटून पळून जाणाऱ्या पाच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे अवघ्या 12 तासांत पोलिसांनी आरोपींना शोधून काढलं आहे.


सातारा : कलेक्टर ऑफिससमोर कुरिअर कर्मचाऱ्याला मारहाण करून 22 तोळे दागिने लुटून पलायन केलेल्या दरोडेखोरांना अवघ्या 12 तासात जेरबंद करण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे. काल (शुक्रवारी) रात्री साडे बाराच्या सुमारास ही लूटमार झाली होती. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे दरोडेखोरांचा पाठलाग करत महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कुरिअर कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचाच या गुन्ह्याच्या कटात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक सुधीर मोरे यांनी दरोड्याच्या घटनेची सविस्तर माहिती देताना सांगितले की, साताऱ्यातील लक्ष्मी कुरिअर कंपनीचा कर्मचारी 22 तोळ्याचे दागिने घेऊन कोल्हापूरहून येणाऱ्या ट्रॅव्हल्समधून पुण्याला जाणार होता. त्यासाठी तो सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला असताना स्विफ्ट कारमधून आलेल्या पाच जणांनी त्याला जबर मारहाण करत त्याच्याकडील दागिने लुटून कारमधून पलायन केले.

पोलिसांनी कारवाई कशी केली?
कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याने घटनेची माहिती सातारा शहर पोलिसांना दिली. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतली. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. संशयित आरोपी अहिल्यानगर मार्गे धुळ्याकडे चालले असल्याचे लक्षात आल्याने सातारा पोलिसांनी शिरपूर पोलिसांना अलर्ट केले.

महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील शिरपूर येथे सापळा रचून सातारा आणि शिरपूर पोलिसांनी पाचही दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे. दरोडेखोरांनी लुटलेले 22 तोळे सोने तसेच गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार ताब्यात घेतली आहे. सध्या संशयितांना घेऊन सातारा शहर डीबी पथक साताऱ्याला येत आहे. अभिषेक शिकलगार, अंकुश जाट, अनुज दिवाकर, पंकज राठोड आणि अजय राठोड, अशी संशयितांची नावे असून ते मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचे आहेत. धाडसी दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणून दरोडेखोरांना जेरबंद केल्याबद्दल सातारा शहर पोलिसांचे कौतुक होत आहे.


न्यूज मराठी लाईव्ह 

सातारा 

Post a Comment

Previous Post Next Post