धोम डाव्या कालव्याची गळती तातडीने दुरुस्त करून रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन त्वरित सोडण्याची मागणी


सातारा : धोम धरण पाणी बचाव संघर्ष समिती (वाई–जावली–सातारा–कोरेगाव) यांच्या वतीने सातारा सिंचन मंडळाचे मा. अधिक्षक अभियंता तसेच सातारा सिंचन विभागाचे मा. कार्यकारी अभियंता यांच्याकडे धोम डाव्या कालव्याची गळती तातडीने काढून रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन त्वरित सोडण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. धोम डाव्या कालव्याचे कोरेगाव शहरापासून टेलपर्यंत, म्हणजेच रहिमतपूरच्या पुढील भागात गेल्या एक महिन्यापासून पाणी बंद आहे. 

त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, ऊस आदी पिकांसह धोम धरणाच्या कार्यक्षेत्रातील पूर्व हंगामातील उसाची लागवड व उभ्या उसाच्या पिकांना पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाणी न मिळाल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. धोम डाव्या कालव्याला किलोमीटर १२, ४५ व ५५ या ठिकाणी गळती लागली असून या ठिकाणी कालवा दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. ही डागडुजी तातडीने पूर्ण करून लवकरात लवकर कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे. 

पाणी वेळेत न मिळाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रकांत रावसाहेब बर्गे, कार्याध्यक्ष रणजीत शिवाजीराव फाळके तसेच सहकारी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार दगडू माने-पाटील यांनी प्रशासनाने या गंभीर बाबीकडे जातीने लक्ष घालून शनिवार, दि. ०७/०२/२०२६ रोजी तातडीने धोम डाव्या कालव्याला पाणी सोडावे, अशी नम्र पण ठाम मागणी केली आहे. पाणी सोडण्यात विलंब झाल्यास पिकांचे अपरिमित नुकसान होण्याची शक्यता असून प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


न्युज मराठी लाईव्ह 
सातारा 

Post a Comment

Previous Post Next Post