सर्वांच्या सहकार्यातून प्रतापगड कारखाना सक्षम होईल ना. शिवेंद्रसिंहराजे; कारखान्याच्या गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ


 सोनगाव (कुडाळ) : जावली तालुक्यातील एकमेव मोठी सहकारी संस्था म्हणजे प्रतापगड कारखाना होय! हा कारखाना तुमच्या सर्वांच्याच हक्काची संस्था आहे. ही संस्था सक्षम करणे ही काळाची गरज आहे. तुमचा कारखाना सक्षम झाला तर तालुक्यातील शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने आर्थिक उन्नती होणार आहे. 
              

आज कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ होत आहे. आजही अनेक अडचणी आहेत, कारखानदारीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी कारखाना काटकसरीने चालवण्याचा प्रयत्न करत आहोत. आज जरी प्रतापगडची परिस्थिती नाजूक असली तरी भवष्यात आपण नक्कीच स्पर्धेत सर्वांच्या पुढे असू, सर्वांच्या सहकार्यातून प्रतापगड कारखाना निश्चितच सक्षम होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. 


सोनगाव ता. जावली येथे अजिंक्यतारा- प्रतापगड उद्योग संचलीत प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ सोहळा गव्हाणीत मोळी टाकून मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी प्रतापगड कारखान्याचे चे अध्यक्ष सैारभ शिंदे, ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे, उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, अजिंक्यतारा कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, राजेंद्र भिलारे आदी मान्यवरांसह दोन्ही कारखान्याचे संचालक उपस्थित होते. 
 

स्वर्गिय लालसिंगराव शिंदे व स्वर्गीय राजेंद्र भैय्या यांनी प्रतापगड कारखान्याची उभारणी केली. कारखाना चालवण्याचा प्रयत्न केला. आज हे दोन्ही नेतृत्व आपल्यात नाहीत पण, कारखाना इथेच आहे. हा कारखाना जावलीतील सभासद शेतकऱ्यांचा हक्काचा कारखाना आहे. आपला उस आपल्या हक्काच्याच प्रतापगड कारखान्यात गाळपासाठी पाठवून ही संस्था सक्षम करण्यासाठी सर्वानीच योगदान दिले पाहिजे. निसर्ग व पावसामुळे यंदाच्या हंगामात थोडा अडथळा येत असला तरीही यंदाचा गाळप हंगाम संचालक मंडळ यशस्वी करणार असून सर्वांच्या सहकार्याने प्रतापगड कारखाना पुन्हा भरारी घेईल व येथील शेतकऱ्यांना उभारी येईल. यंदाच्या हंगामासाठी अंदाजे ७७०० हेक्टर एवढी ऊसाची नोंद झाली असून तोडणी वाहतूक यंत्रणाही सज्ज करण्यात आली आहे, त्यामूळे हंगाम यशस्वीतेसाठी जावली तालुक्यातील सर्व ऊस उत्पादकांनी प्रतापगडलाच उस घालून शेतकरी आणि कामगारांचे भविष्य उज्वल करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.


ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, कारखान्याचा इतिहास सर्वांना माहिती आहे. कारखान्याचे मालक सभासद- शेतकरीच आहेत, आम्ही फक्त केअर टेकर म्हणून काम करत आहोत. हा कारखाना कायमस्वरूपी जोमाने सूरू राहणे गरजेचे आहे, येथील शेतकरी आर्थिक सक्षम झाला पाहिजे याच हेतूने आम्ही कारखाना सुरु केला असून हा प्रयत्न यशस्वी होण्यासाठी तालुक्यातील सर्वांनी आपला ऊस या कारखान्याला पुरवावा हीच विनंती आहे. कारखान्याचे कामकाज राजकारण विरहित असून गटतट न पाहता सर्वांचाच ऊस घेतला जाणार आहे. यंदाची पावसाची परिस्थिती पाहता अनेक अडचणी आहेत. ऊस दराच्या बद्दल कोणीही चिंता करू नये. अत्यंत काटकसरीने आपण कारखाना चालवणार असून फक्त तुमचे सहकार्य कायम ठेवा, सर्वांच्या साथीने हा कारखाना सक्षम करूया, असे ते म्हणाले. 


अध्यक्ष सैारभ शिंदे म्हणाले, तालुक्याचा हक्काचा कारखाना दोन हंगामापासून सुरू झाला आहे हे तालुक्यासाठी महत्वाचे आहे. आता हा कारखाना सक्षमपणे चालवा यासाठी जास्तीत जास्त ऊस आपल्याच कारखान्याला घालून सर्वांनी सहकार्य करावे. आजच्या नव्या सुरूवातीमध्ये अजिंक्यतारा कारखान्याचे मोलाचे योगदान आहे, कारखान्यामुळे सर्वच चक्र गतीमान होणार असून शेतकरी, कामगार व सभासद सर्वांचेच आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कारखान्याला सर्वांनी सहकार्य करावे.
प्रतापगड कारखान्याचे उपाध्यक्ष मर्ढेकर यांनी प्रास्ताविक केले. अजिंक्यतारा कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव साळुंखे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सभासद, शेतकरी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

न्यूज मराठी लाईव्ह 
कुडाळ / जावली 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने