सातारा : सातार्यात एका मद्यधुंद रिक्षाचालकाने भरधाव वेगाचा कहर केला. त्याने अनेक गाड्यांना धडक दिली. एवढेच नाही तर वाहतूक शाखेतील महिला पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. संतप्त नागरिकांनी रिक्षाचालकाला चोप दिला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
साताऱ्यातील खंडोबाचा माळ ते मार्केट यार्ड दरम्यान मद्यधुंद रिक्षाचालकाने बेदरकारपणे रिक्षा चालवत सहा दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक दिली. त्याला थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक शाखेतील महिला कॉन्स्टेबलला खेचून शंभर मीटरपर्यंत फरफटत नेलं. त्यामुळे त्या रक्तबंबाळ झाल्या. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संतप्त नागरिकांनी रिक्षाचालकाचा पाठलाग करून रिक्षा अडवली आणि चालकाला बेदम चोप दिला.
मार्केट यार्ड रस्त्यावर थरार अन् धावाधाव
मद्यधुंद अवस्थेत रिक्षा चालक खंडोबाचा माळ येथून मार्केट यार्ड रस्त्याने बेदरकार रिक्षा चालवत येत होता. यादरम्यान त्याने अनेक दुचाकी तसेच चार चाकी वाहनांना धडक दिली. शहर वाहतूक शाखेतील महिला कॉन्स्टेबलने त्याला अडविण्याचा प्रयत्न करताच चालकाने त्यांच्या हाताला पकडून रिक्षा वेगाने चालवली. त्यांना रस्त्यावरून शंभर मीटर अंतर फरफटत नेले. यावेळी मार्केट यार्ड रस्त्यावर भरधाव रिक्षाचा थरार आणि नागरिकांची धावाधाव पाहायला मिळाली.
महिला कॉन्स्टेबल गंभीररित्या जखमी
रिक्षा चालकाने फरफटत नेल्यामुळे महिला कॉन्स्टेबल रक्तबंबाळ होऊन त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. रिक्षाचालक महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेत असल्याचे पाहून त्यांना वाचविण्यासाठी अनेक नागरिक रिक्षाच्या मागे धावत होते. अखेर नागरिकांनी रिक्षा अडवली. मद्यपी चालकाला बेदम चोप दिला. जखमी महिला कॉन्स्टेबलला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केलं. पोलीस आल्यानंतर रिक्षा चालकाला त्यांनी ताब्यात घेतलं. रात्री त्याला अटक करण्यात आली.
रिक्षा चालकांची मुजोरी चव्हाट्यावर
साताऱ्यात वाहतुकीची शिस्त बिघडलेली असतानाच आता त्यात रिक्षा चालकांच्या मुजोरीची भर पडली आहे. रिक्षाचालक कधीही वाहतुकीचे नियम पाळत नाहीतच शिवाय प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा दराने पैसे घेतात. प्रवाशांना उर्मटपणे बोलतात. दारूच्या नशेत वाहन चालविणे, महिलांना टोमणे मारणे, अशा घटना घडत असल्याच्या तक्रारीही आता नागरीक करत आहेत.
न्यूज मराठी लाईव्ह
सातारा

टिप्पणी पोस्ट करा