पालक व शिक्षक सहविचार सभा हुतात्मा परशुराम विद्यालय येथे संपन्न

प्रतिनिधी / श्री.लालासाहेब माने (पाटील)
वडूज / सातारा 


वडूज (सातारा) : पालक व शिक्षक सहविचार सभा हुतात्मा परशुराम विद्यालय येथे संपन्न. या सभेला जवळपास 700 पालक उपस्थित होते. पालक शिक्षक सहविचार सभेचा उद्देश होता की प्रत्येक वर्गासाठी एका पालकाची नियुक्ती करणे, त्याचबरोबर विविध शिष्यवृत्ती व शासन योजनांची माहिती देणे, विद्यालयातील परीक्षा व इतर नियोजनांची माहिती पालकांच्या पर्यंत पोहोचावी व पालकांच्याकडून येणाऱ्या सूचनांचे निराकरण करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे.
 

महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणांचा विचार करून ते धोरण अमलात आणण्यासाठी पालकांच्या सहकार्याची अपेक्षा असते, विद्यार्थी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी बाबत पालकांशी चर्चा करण्यात आली. विद्यालयाच्या पर्यंवेक्षिका सौ.एस.पी.जोशी मॅडम यांनी या सभेचे प्रस्ताविक केले.
 
विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व शिस्त विभाग प्रमुख श्री.राजेंद्र जगदाळे यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या शिस्तीबद्दल माहिती दिली. विद्यालयाच्या ज्येष्ठ पर्यंवेक्षिका सौ.बी.एस.माने मॅडम यांनी सभेचा हेतू स्पष्ट करत विद्यालयात घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा विविध शिष्यवृत्ती माहिती दिली.त्याचबरोबर अभ्यासक्रमाचे नियोजन व विविध उपक्रम, शिवाय एक पेड माँ के नाम,ग्राम स्वच्छता ॲप इत्यादी बाबत पालकांना माहिती देऊन लिंक भरण्याची विनंती केली.
 
पालकांच्या मधून श्री.हिंदुराव काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले विद्यालयामध्ये विविध उपक्रम राबवल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत आहे व त्यामुळे पालक वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली स्कॉलर बॅच व हुतात्मा पॅटर्न तसेच गुरुकुल विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनींचे अभ्यासातील प्रगती याबद्दल पालक मोहनराव डोंबे यांनी समाधान व्यक्त केले.
 
गतवर्षीच्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.भरत फडतरे यांनी आपल्या विद्यालयातील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मंदार जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले या विद्यालयात सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो व त्यातूनही विद्यार्थी राज्यस्तरापर्यंत आणले जातात ही एक समाधानाची बाब आहे. 

विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री.एम.बी.भोकरे सर यांनी पालकांना विद्यार्थ्यांचे वर्तन आचरण अध्ययन याबाबत पालकांची भूमिका काय असावी हे आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले. पालकांच्या मधून श्री.सखाराम खरमाटे यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अजिबात वापर करू नये असे सुचवले त्याच बरोबर जेव्हा पालक विद्यालयामध्ये येतील तेव्हा त्यांना योग्य ती माहिती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. पालक सभेसाठी निमंत्रित केलेल्या पालकांच्या मध्ये उस्ताह दिसून येत होता. या शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये शिस्त दिसून येत आहे असे मत पालकांच्या मधून व्यक्त करण्यात आले.
 
या सभेसाठी सर्व वर्गाचे वर्ग शिक्षक व विशेष शिक्षक उपस्थित होते. सभेच्या शेवटी विद्यालयातील गुरुकुल विभागाचे प्रमुख श्री.घनवट सर यांनी उपस्थित पालकांचे आभार मानले व सभा खेळीमेळी च्या वातावरणात पार पडली.

न्युज मराठी लाईव्ह
वडूज / सातारा


Post a Comment

Previous Post Next Post