कण्हेर जलाशय परिसरातील शेतकरी एकवटला यावर्षी जास्तीत जास्त झाडे लावण्याचा घेतला एकमताने निर्णय

श्री.संजय वांगडे
प्रतिनिधी / मेढा (जावली)


जावली : रविवार दि. ८ जून२०२५ रोजी मेढा येथे आधुनिक शेती विषयक मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन निझरे गावचे सुपुत्र सातारा पोलीस श्री.भरत जाधव यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मेढा तसेच दक्षिण विभागातील सर्व शेतकरी वर्ग उपस्थित राहून यावर्षी प्रत्येक जण आपल्या शेतात तसेच शेताच्या बांधावर जास्तीत जास्त झाडे लावण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. एकच ध्यास आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास या उक्तीप्रमाणे आलेले सर्व शेतकऱ्यांनी झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे.
 
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा... भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करत, आपल्या भारत मातेचे रक्षण करते शूरवीर भारतीय सैनिकांना सॅल्यूट देत सर्व माय-बाप, बंधू-भगिनींना, नवतरुण विकास मंडळांना, कॉलेज विद्यार्थी मित्रांना समाज प्रबोधनकार भरत जाधव यांनी हात जोडून नमस्कार केला.

आपण सर्व ज्ञानी व समजदार आहात... आपल्या कण्हेर धरणाच्या मेढा जावली दोन्ही बाजूचा परिसर पावसाळ्यात हिरवा गार दिसतो. उन्हाळ्यात मात्र रख रखते उन शिवारं मोकळी, धरणाचे पाणी खाली गेलेले आणि ओसाड पडलेले डोंगर व पडीक जमीनी... ना बागायत, ना एमआयडीसी, ना कंपन्या, ना रोजगार, ना छोटे मोठे व्यवसाय जगाचा पोशिंदा शेतकरी राजाची मुले आहोत आपण, शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आपण... छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी आयुष्य अर्पण केले... आपण जगाचे पाहुणे आहोत. 

मालक नाही एक दिवस सर्वजणच जाणार आहोत. गेल्यानंतर माणसाच्या कर्माचीच चर्चा होत असते... स्वतःचे घर चालवले म्हणजे विश्व गाजवले असे नाहीये... आपण समाजाचे देणेकरी आहोत. या मातीचे, माता-पित्याचे देशाचे अनंत उपकार आहेत आपल्यावर... सुख दुसऱ्याला दिल्याशिवाय आपल्याला मिळतच नसतं... एकच जात माणुसकी, एकच धर्म मानवता... आपण आपल्या परिसराच्या हितासाठी आणि पुढच्या पिढीसाठी एक मताने एक निर्णय सर्वजण घेऊयात... जास्तीत जास्त झाडे व फळबागा लावूयात आणि आपल्या मुलाप्रमाणे त्यांची काळजी घेऊन झाडे व फळबागा वाढवूयात. 

ज्यांना झाडे लावण्यासाठी जागा आहेत पण त्या शेतकऱ्याची खरोखरच आर्थिक परस्थिती बिकट आहे, झाडे लावता येत नसतील अशा सर्व शेतकरी कुटुंबांना प्रत्येक गावातील विकास मंडळांनी, दानशुरांनी जास्ती जास्त झाडे आदर पूर्वक दान करावीत व आवश्यक ती मदत करावी... त्यामुळे अशा कुटुंबांना मनसोक्त फळे खायला मिळतील आणि राहिलेली फळे विकूही शकतील त्यातून त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी व घर खर्चासाठी एक प्रकारची आर्थिक मदत होण्यास वाव मिळेल.


कण्हेर धरणाच्या दोन्ही बाजूचे सर्व गावातील ग्रामस्थांनी, विविध मंडळांनी, दानशुरांनी, देशप्रेमींनी आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी, देश हितासाठी, शिक्षणासाठी, प्रत्येकाच्या आरोग्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी चिकाटीने व एक मताने एकत्र यावे. "निसर्ग वाचता तरच आपण वाचणार आहोत" आपल्याकडे कितीही पैसा असला तरी ऑक्सिजन, पाणी, निरोगी जीवन हे सर्व झाडेच देणार आहेत. खरी संपत्ती निसर्गच आहे "मानव सेवा हीच ईवर सेवा आहे." निसर्गच देव आहे, कण्हेर धरणाच्या दोन्ही बाजूच्या परिसराचे नंदनवन करण्यासाठी आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. 

यासाठी प्रत्येकाने किमान नारळ, आंबे, पेरू, चिकू, आवळा, लिंबू, जांभूळ अशी जास्ती जास्त फळ झाडे लावून त्याच्या प्रत्येकाने फळबागा (सेंद्रिय पध्दतीनेच) कराव्यात यासाठी शासनाचे अनुदान सुध्दा मिळते. त्यामुळे प्रत्येकाला त्यातून एक प्रकारचे आर्थिक उत्पन्न सुरु होण्यास मदत होईल. ज्या जमीनी पडीक राहत आलेल्या आहेत. त्या सुपिक होण्यास मदत होईल. व वाड्या वस्त्या व गावा गावात निसर्ग फुलू लागेल. 
सामाजिक वनीकरणामार्फत विविध वनऔषधी झाडे मोफत मिळतात. ही झाडे गावातील तरुण मंडळांनी गावालगत चे डोंगर व पडीक जमीनी या ठिकाणी लावावीत. 

उदा. वड, लिंब, पिंप्रन, सिताफळ, रामफळ, आवळा, गुलमोहर इ. अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावावीत. त्यांची निगा राखण्यासाठी सर्वांनी डोंगरावर ट्रेकिंग करण्यासाठी जावून झाडांचे संरक्षण करावे यामधून प्रत्येकाची शारीरिक सुदृढता होईल आणि झाडांची सुध्दा निगा राखली जाईल. आपल्या डोंगर परिसरात झाडे वाढल्यावर शुद्ध हवा व ऑक्सिजन मिळेल. सर्वांची बौद्धिक व शारीरिक क्षमता वाढेल. 

शहरातील लोकं निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी पैसा खर्च करतात. मग आपल्याकडे निसर्गानेच दिलेली ही देणगीच आहे. त्याचा वापर योग्य पध्दतीने केला तर आपण व आपल्या पुढील पिढीला निसर्गाच्या सानिध्यात कायमस्वरूपी मोफत आनंदात राहता येईल. आपल्या सर्वांचे एकीमुळे सभोवतालच्या परिसराचे सौंदर्य वाढेल आणि परिसराचे नंदनवन होईल.अशी माहिती या मार्गदर्शन वेळी देण्यात आली. या कार्यक्रमाला मेढा तसेच मेढा दक्षिण विभागातील सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


न्यूज मराठी लाईव्ह 
मेढा (जावली)

Post a Comment

Previous Post Next Post