बातमी : श्री.अनिल करंदकर (पाटील)
सातारा
सेवेचा शुभारंभ शिर्डी येथून; देशभरात व आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू होणार उपक्रम.
सातारा : जगभरातील पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेणारा एक ऐतिहासिक उपक्रम ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम संघटनेने सुरू केला असून, संघटनेच्या सर्व पत्रकार सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी आरोग्य सेवेचा शुभारंभ महाराष्ट्रातील शिर्डी येथून झाला असून, लवकरच ही सेवा भारताच्या सर्व राज्यांत तसेच जगभरातील व्हॉईस ऑफ मीडिया नेटवर्क असणाऱ्या सर्व देशांमध्ये सुरू होणार आहे.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना आणि आत्मा मालिक हॉस्पिटल (श्री विश्वात्मक जंगलीदास महाराज ट्रस्ट संचालित) यांच्यात नुकताच आरोग्य सेवा करार झाला आहे. या करारानुसार, सात ते आठ लाख पत्रकार सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांसह एकूण ३० ते ३५ लाख नागरिकांना विविध वैद्यकीय सेवा पूर्णतः मोफत मिळणार आहेत.
औपचारिक घोषणा आणि करार:
या कराराची औपचारिक घोषणा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या राज्यस्तरीय पत्रकार कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी आत्मा मालिक हॉस्पिटलचे सीईओ श्री. सुनील पोकळे यांनी केली. या सामंजस्य करारावर आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीने सुनील पोकळे, तर व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आरोग्य विंग प्रमुख भिमेश मुतूला यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
कराराअंतर्गत मिळणाऱ्या प्रमुख सेवा:
• सर्वसामान्य तपासणी (OPD) – पूर्णपणे मोफत
• IPD अंतर्गत सर्व उपचार – पूर्णपणे मोफत
• ब्लड टेस्ट, एक्स-रे, सोनोग्राफी, ECG यांसारख्या मूलभूत तपासण्या – मोफत
• आपत्कालीन सेवा (Emergency) आणि शस्त्रक्रिया (Surgery) – मोफत
• आरोग्य शिबिरे, मानसिक आरोग्य मार्गदर्शन, तणाव व्यवस्थापन सेवा – मोफत
• वार्षिक आरोग्य तपासणी पॅकेजेस – मोफत
• हॉस्पिटलमध्ये उपलब्ध औषधांवर ५०% सवलत
या सर्व सेवा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेचे सदस्यत्व प्रमाणपत्र व ओळखपत्र सादर केल्यानंतरच प्राप्त होतील.
भविष्यकालीन आराखडा:
या उपक्रमांतर्गत, येत्या वर्षभरात महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमध्ये, देशभरातील सर्व प्रमुख राज्यांमध्ये आणि विविध आंतरराष्ट्रीय ठिकाणी ही मोफत आरोग्य सेवा सुरू केली जाणार आहे.
संघटनेचा पुढाकार पत्रकारांच्या हक्क, सुरक्षा आणि सामाजिक कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम संघटनेचा हा एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम ठरत आहे. संघटनेचा उद्देश केवळ पत्रकारांचे आर्थिक, व्यावसायिक नव्हे तर आरोग्यदृष्ट्याही सशक्तीकरण करणे हाच आहे. राज्यातील शेवटच्या पत्रकार यांच्यापर्यंत मोफत आरोग्य सेवेचा मूलमंत्र ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पोहोचवणार आहे, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी दिली आहे. या आरोग्य सेवेस प्रारंभ झालाय असे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्य समन्वयक कुमार कडलग आणि गोरक्ष मदने यांनी सांगितले.
“हा उपक्रम म्हणजे पत्रकार बांधवांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारण्याची सुरुवात आहे. संपूर्ण देशात आणि परदेशात ही सेवा विस्तारली जाईल.”
– संदीप काळे, संस्थापक अध्यक्ष, व्हॉईस ऑफ मीडिया व VOM इंटरनॅशनल फोरम
‘आत्मा मालिक’ संस्थेचे ‘आत्मा मालिक’ मल्टीस्पेशल हॉस्पिटलमधून पत्रकार यांना मोफत आरोग्य सेवा दिली जाणार आहे. आज त्या संबंधाचा करार ‘आत्मा मालिक’ संस्थेचे ‘आत्मा मालिक’ मल्टीस्पेशल हॉस्पिटलचे सीईओ सुनील पोकळे यांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आरोग्य सेलचे प्रमुख भीमेश मुतूला यांना स्वाक्षरी करून दिला. यावेळी खा. भाऊसाहेब वाघचोरे,गगन मल्होत्रा, सारिका पन्हाळकर, राजशेखरजी यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
न्युज मराठी लाईव्ह
सातारा