जावली तालुक्यातील क्षेत्र कुसुंबीच्या काळेश्वरी देवीच्या यात्रेस प्रारंभ

बातमी : श्री.अनिल करंदकर  (पाटील)



कुसुंबी (जावली) : सालाबादप्रमाणे क्षेत्र कुसुंबी,गावची यात्रेला प्रारंभ होत आहे ग्रामस्थ मंडळ व काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटी कुसुंबी यांच्या वतीने कुसुंबीच्या काळेश्वरी देवीच्या यात्रेस येणाऱ्या सर्व भाविकांना सर्व सुविधा पुरविल्या जातील. दि.12 माघ शु. पौर्णिमा या दिवशी देवीच्या यात्रेस प्रारंभ होत असून रविवार, दि. 16 रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे.

बुधवार दि.12 देवीची ध्वज काठी उभारली जाणार आहे. शुक्रवार दि. 14 रोजी काळेश्वरी देवीचा रूद्राभिषेक हा सकाळी ७ वाजता. सुरु होईल. हा अभिषेक २ तास चालू असतो. या अभिषेकानंतर देवीला हळद कुंकवाचा मान देण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात आरतीचे ताट घेवून मंदिरात उपस्थित असतात. अभिषेक होईपर्यंत मंदिर व मंदिर परिसर महिलांनी गजबजून जातो. 

अभिषेक झाल्यानंतर देवीला अलंकाराचा साज चढविला जातो. त्यानंतर महाआरती होते. आरती झाली की प्रत्येक महिला रांगेतून देवीला हळदी कुंकवाचा मान देतात. उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांना विश्वस्त मंडळाकडून भेटवस्तू दिली जाते.शनिवार दि. 15 रोजी जागर (छबिना) असून देवीची मिरवणूक या दिवशी पालखीतून काढली जाते. मिरवणुकीसाठी सकाळपासून महाराष्ट्र, कर्नाटक तसेच इतर राज्यातून भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होण्यास सुरुवात होते. रात्री १० वाजता मिरवणुकीला सुरुवात होते. 

तत्पूर्वी मालचौंडी गावची काळुबाईची पालखी व गांजे येथील भैरवनाथाची पालखी या मिरवणुकीत सहभागी होतात. या पालख्या आल्यानंतर भेटीचा (मानपान) कार्यक्रम होतो. त्यानंतर देवीची पालखीतून भव्य अशी मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीमध्ये इतर पालख्या तसेच देवी देवतांच्या मुर्ती, सासन काठ्या सहभागी होतात. ढोल ताशे, लेझीम पथकासोबत गुलालाची उधळण करत काळुबाईच्या नावानं चांगभलंचा गजर करीत देवीची मिरवणूक गावातून निघते. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक मिरवणूकीमध्ये सहभागी होतात.

रविवार, दि. 16 रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी लाखो भाविक देवीचे दर्शन घेतात. विश्वस्त व ग्रामस्थ मंडळ यांच्या मार्फत भाविकांसाठी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या विशेष एसटी बसेस ची नियोजन केले जाते तसेच जंगी कुस्तीच्या फडाचे नियोजन दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत केले जाते. भव्य कुस्त्यांचा फडामध्ये काळेश्वरी केसरी हा किताब दिला जातो. दि. 15 फेब्रुवारी रोजी. सायंकाळी ७ ते१० या वेळेत व दिनांक. 16 फेब्रुवारी सकाळी ८ ते सायंकाळी ४ पर्यंत ग्रामस्थ मंडळ व शिवतेज ग्रुप कुसुंबी. यांच्या मार्फत महाप्रसादाचे नियोजन केले जाते, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष. रामदास वेंदे, सरपंच चिकणे यांनी दिली.

न्युज मराठी लाईव्ह 
कुसुंबी (जावली)

Post a Comment

Previous Post Next Post