प्रतिनिधी: श्री. अनिल मोरे
कराड : कराड नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी यशवंत विकास आघाडीतून जोरदार चुरस निर्माण झाली आहे. या पदासाठी नरेंद्र लिबे, भास्कर देसाई आणि हणमंत पवार अशी तीन नावे सध्या चर्चेत असून, यामध्ये नरेंद्र लिबे यांना संधी द्यावी, अशी ठाम मागणी त्यांच्या प्रभागातील कार्यकर्त्यांकडून होत आहे.
नरेंद्र लिबे हे यशवंत विकास आघाडीचे निष्ठावंत व सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. आजतागायत त्यांनी पक्षासाठी सातत्याने काम केले असले, तरी त्यांना कधीही नगरसेवक पदाची संधी मिळालेली नाही. विशेष म्हणजे इतर इच्छुक उमेदवारांनी यापूर्वी नगरसेवक पद भूषवलेले असल्याने, यावेळी नव्या व निष्ठावंत नेतृत्वाला संधी मिळावी, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
सर्वसामान्य नागरिकांमध्ये सतत मिसळून काम करणारे कार्यकर्ते म्हणून नरेंद्र लिबे यांची ओळख आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते कायम पुढाकार घेत असल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा असून, सामाजिक व विकासकामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
यशवंत विकास आघाडीने सत्तास्थापना केल्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी चर्चा सुरू असताना, निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळावी, अशी मागणी आघाडीतील कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे. नरेंद्र लिबे यांना संधी मिळाल्यास ते पालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय देतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, भास्कर देसाई व हणमंत पवार यांची नावेही चर्चेत असून, अंतिम निर्णय आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेतला जाणार आहे. नरेंद्र लिबे यांच्यासारख्या युवा नेतृत्वाला संधी मिळाल्यास यशवंत विकास आघाडीने नव्या नेतृत्वाला प्राधान्य दिल्याचा सकारात्मक संदेश समाजात जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपदी अखेर कोणाची वर्णी लागते, याकडे कराडकरांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
कराड / सातारा

Post a Comment