प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी
मेढा : दि. ३० श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यातील सावली येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सावली (ता. जावळी) येथे हे भव्य महाआरोग्य शिबीर संपन्न होणार असल्याची माहिती सरपंच विजय सपकाळ यांनी दिली.
मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानाअंतर्गत नववर्षाच्या प्रारंभी जिल्हा बँकेचे संचालक व तालुक्याचे वैभव मानले जाणारे लोकनेते ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे महाशिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर, आधारकार्ड कॅम्प तसेच ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र वाटप असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पुणे येथील जागतिक सुप्रसिद्ध एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने तज्ञ नेत्रतज्ज्ञांकडून मोफत डोळ्यांची तपासणी करण्यात येणार असून गरजूंना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच डोळ्यांच्या इतर शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
लोकनेते ज्ञानदेवजी रांजणे साहेबांच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त ५० प्लस रक्तदात्यांचे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून हे शिबीर बालाजी ब्लड बँक यांच्या सहकार्यातून होणार आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
तसेच या ठिकाणी आधारकार्ड कॅम्प आयोजित करण्यात आला असून यामध्ये आधारकार्ड अपडेट, लिंक व दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याचबरोबर ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना शासकीय ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र देण्यात येणार आहे. यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी एक पासपोर्ट साईज फोटो, तलाठी रहिवासी दाखला, रेशनकार्ड व आधारकार्डच्या झेरॉक्स प्रती, शाळा सोडल्याचा दाखला किंवा तो उपलब्ध नसल्यास शासकीय रुग्णालयातून वयाचा दाखला सोबत आणणे आवश्यक आहे.
या सर्व समाजोपयोगी उपक्रमांचा लाभ ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायत सावली, ग्रामस्थ मंडळ, अजिंक्य नेहरू युवा मंडळ, श्री काळेश्वरी प्रतिष्ठान जन्मभूमी सेवा मंडळ सावली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
मेढा / जावली

Post a Comment