श्रम संस्कार शिबीराने ग्रामविकासाला चालना – डॉ. निलेश पाटील

प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी

मेढा : दि. २९ जावली तालुक्यातील आदर्श व स्मार्ट ग्राम चोरांबे येथे आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रम संस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थान माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी भूषविले.

यावेळी बोलताना डॉ. निलेश पाटील म्हणाले, “चोरांबे गावाने आदर्श व स्मार्ट ग्राम म्हणून निर्माण केलेली ओळख ही लोकसहभाग, स्वच्छता, श्रमसंस्कार आणि सामाजिक जाणीव यामुळेच शक्य झाली आहे. अशा श्रम संस्कार शिबिरांमुळे युवकांमध्ये श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन आणि ग्रामविकासाची भावना रुजते. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळते,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात माजी आमदार सदाशिव सपकाळ म्हणाले, “आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे ग्रामीण भागासाठीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक एकोपा आणि लोकजागृतीसाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांतूनच समाज घडतो आणि जबाबदार नागरिक निर्माण होतात,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात शिबिरादरम्यान राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी यांनी मांडला. शिबिरात सहभागी स्वयंसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास जयवंत प्रतिष्ठान, हूमगावचे विश्वस्त श्री. दादासाहेब शिंदे, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ. प्रमोद घाटगे, चोरांबे गावचे सरपंच श्री. विजय भ. सपकाळ, ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय धोंडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सौ. धनश्री देशमुख यांनी केले, तर आभार प्रा. प्रकाश जवळ यांनी मानले.

न्यूज मराठी लाईव्ह 
मेढा / जावली 

Post a Comment

Previous Post Next Post