कुडाळ (जावली) : सातारा जिल्ह्यातील मेढा पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ कारवाई करत खूनाचा प्रयत्न करणा-या आरोपीला अटक केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जावली तालुक्यातील बलकवडेवाडी येथे ही घटना घडली. आरोपी अमीर बबन गलगले याने फिर्यादी यांच्या वहिणीवर जबरदस्तीचा प्रयत्न करत विरोध झाल्यानंतर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून विशेष पथक तयार केलं. गोपनीय माहितीच्या आधारे ४ नोव्हेंबर रोजी आरोपी संगम माहुली (सातारा) येथे लपून बसल्याचं समोर आलं. पोलिसांनी तातडीची कारवाई करत त्याला अटक केली.
सध्या आरोपीला १० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती आश्विनी पाटील या करत आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, आणि उपविभागीय अधिकारी सुनिल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. या यशस्वी कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व पथकाचं अभिनंदन केलं आहे. महिलांवर होणा-या अत्याचारांविरोधात पोलिसांची ही कारवाई अनुकरणीय ठरावी, अशी नागरिकांची प्रतिक्रिया आहे.
न्युज मराठी लाईव्ह
जावली / सातारा


Post a Comment