जावळी तालुक्यातील शेतकरी पुन्हा संकटात; ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची मागणी

 प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी


मेढा : जावळी तालुक्यातील शेतकरी गेली ६ महिने सातत्याने पडणार्‍या पावसामुळे संकटात आला. जावळीच्या आसपासच्या तालुक्यांना ओल्या दुष्काळाच्या यादीत शासनाने बसविले पण निकषाच्या आधारावर जावळीला मात्र नाकारले.

मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने सोयाबीन, कडधान्याची पेरणी करता आली नाही. भातशेती थोडी बरी दिसत होती, पण डूकरांनी उध्वस्थ केली. थोडे फार उरलेले धान घरात येईल असे वाटत असताना भात काढणीच्या प्रतिक्षेत असणार्‍या शेतकर्‍यांवर पुन्हा एकदा निसर्गाचा प्रकोप दिसत आहे.

पाऊस सतत पडत असल्याने हातातोंडाला आलेले भात काढणी विना शेतात आडवे झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.या वर्षी सतत पडणार्‍या पावसामुळे जावळी तालुक्यातील शेतकर्‍यांवर अस्मानी संकट आले आहे. 

कडधान्य व सोयाबीन विकून सामान्य शेतकरी दिवाळीचा सण साजरा करतो पण यावर्षी पेरणीच न झाल्याने शेतकरी वर्गाची दिवाळी गोड होण्याऐवजी कडू झाली. मुख्य पीक भात थोडे बरे आहे.त्याच्यावरच वर्ष काढता येईल अशा आशेवर असणारा शेतकरी आतामात्र चिंतातूर झाला आहे.

आधिच रानातील जनावरांनी पिके आडवी केली आहेत.हाळवी भाते काढायला आली असून पाऊस मात्र थांबायचे नावच घेत नाही.अजून चार-आठ दिवस पाऊस थांबला नाही तर शेतात आडवी पडलेली पिके उगवायला सुरूवात होईल अशी भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

खरतरं लोकप्रतिनिधींनी शेताच्या बांधावर जावून पंचनामे करावेत असे आदेश दिले असले तरी महसुल व कृषी विभागातील किती अधिकारी व कर्मचारी शेतकर्‍याच्या शेतावर पोहचले हा चिंतनाचा विषय आहे.

त्यातच भणंग , मेढा , कुसूंबी , मामुर्डी , ओखवडी आंबेघर , केडंबे पंचक्रोशीत रानडुक्कर , गवा या जनावरांकडून होणार्‍या नुकसानीबाबत वनविभागाची नेहमीच उदासिनता दिसून येत आहे.

आता अशा चहूबाजूंनी संकटात सापडलेल्या व निकषाच्या कायद्यात अडकलेल्या जावळी तालुक्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळणार तरी कसा असा प्रश्न जावळीतील सामान्य शेतकरी वर्गाला पडला आहे.



न्यूज मराठी लाईव्ह 

मेढा / सातारा

Post a Comment

Previous Post Next Post