बातमी : श्री अनिल करंदकर (पाटील)
व्हॉईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय अधिवेशनात केंद्रिय मंत्र्यांच्या हस्ते शपथ, पुरस्कार, पदग्रहण आणि ओळखपत्राचे वितरण
देशभरातील विविध राज्यांच्या प्रदेशाध्यक्ष आणि महासचिवांचा सहभाग
नवी दिल्ली : ५२ देशांतील ४ लाख ७० हजारांहून अधिक पत्रकारांशी संलग्न असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाने पत्रकारांच्या समस्या दूर करण्यासाठी खूप मोठे सकारात्मक काम केले. 20 संपादकांनी एकत्र येत संघटनेने सुरु केलेल्या कार्याचा संपूर्ण देशभरात विस्तार होतोयं. पत्रकारांच्या घर, आरोग्य, विमा, पाल्यांचे शिक्षण आणि सेवानिवृत्तीसाठी संघटना काम करीत असून याकरिता व्हॉइस ऑफ मीडियाचे मा. मंत्री महोदयांनी अभिनंदन केले. तळागाळातील नागरिकांना न्याय देण्याचं काम मीडिया करीत असून निष्पक्ष पत्रकारिता देशहितासाठी काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी केंद्रीय मंत्री जितनराम मांझी यांनी केले.
व्हॉईस ऑफ मीडिया व व्हीओएम इंटरनॅशनल फोरमच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. दोन दिवसीय अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे होते. याप्रसंगी मा. जितनराम मांझी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री, खासदार भाऊसाहेब वाकचोरे, राष्ट्रीय संघटक अशोक वानखेडे, देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री महोदयांच्या हस्ते देशभरातील राज्य अध्यक्ष व सचिव यांचा पदग्रहण, पुरस्कार व ओळखपत्र वितरण सोहळा पार पडला तसेच उपस्थित पत्रकारांना शपथ देण्यात आली. या राष्ट्रीय अधिवेशनात दहा ठराव पारित करण्यात आले. सदर ठरावाचे वाचन राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले यांनी केले. दुसऱ्या दिवसाच्या प्रथम सत्रात पत्रकार प्रशिक्षण सत्रासाठी कोच, सायकोलॉजिस्ट व काउन्सिलर ऊर्जा पाटील यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून देशभरातील पत्रकारांना संघटना बांधणी कौशल्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विविध गेम्सच्या माध्यमातून टीम वर्क्स संबंधी महत्व विषद केले.
याप्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना संसद भूषण पुरस्कार, आमदार समीर कुणावार यांना विकास पुरुष पुरस्कार, आदित्य अनघा मल्टिस्टेट क्रेडिट को ऑप सोसायटीच्या अनघा समीर सराफ यांना उद्योग रत्न पुरस्कार, व्यंकटेश जोशी यांना समाज रत्न पुरस्कार आणि डॉ. पंजाब खानसोले यांना विकास रत्न पुरस्कार व पारधी सर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यासोबतच राष्ट्रीय कोअर टीमची निवड करण्यात आली. ज्यामध्ये महाराष्ट्रचे अनिल म्हस्के, मध्यप्रदेशचे दीपक शर्मा, उत्तर प्रदेशाचे प्रेम पाठक, हिमाचल प्रदेशचे विकास शर्मा, हरियाणाचे बन्सीलाल पांचाल, जम्मू काश्मीरचे अक्षित महाजन, आसामच्या स्वप्ना दत्ता, नागालँडचे मॅक्स खिया, मेघालायचे कर्मलांग करिया यांचा समावेश करण्यात आला. दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात व्हॉईस ऑफ मीडियाचे भारतभरातील राज्य अध्यक्ष आणि राज्य सरचिटणीस मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. देशभरातील पत्रकारांना एकत्र आणत पत्रकारिता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नव्या युगाच्या दिशेने हे राष्ट्रीय अधिवेशन प्रेरणादायी ठरले आहे.
न्युज मराठी लाईव्ह
दिल्ली


टिप्पणी पोस्ट करा