बदली होऊनही मर्जीतील कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती देण्यास राष्ट्रवादीचा विरोध.

श्री.जितिन वेंदे 
प्रतिनिधी / जावली (सातारा) 


राष्ट्रवादी अजित पवार गटाचे साधू चिकणे यांचे जिल्हा परिषद प्रशासनास याबाबत निवेदन. 

सातारा : जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय व विनंती बदली प्रक्रिया २० मे पासून सुरू आहे. मात्र दरवर्षींचा या बदल्यामधील अनुभव पाहता प्रशासकीय बदली होऊनही जिल्हा परिषदेमधील अधिकारी हे आपल्या मर्जीतील काही कर्मचाऱ्यांना मुख्यालयातच प्रतिनियुक्तीवर  कार्यरत ठेवत आहेत. ही प्रथा यावर्षीपासून बंद व्हावी. अन्यथा राष्ट्रवादी या विरोधात आंदोलन करणार असल्याचे निवेदन जावली तालुका अध्यक्ष साधू चिकणे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद यांना सादर केले.
       


जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने सुरू केलेली आहे.अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी प्रशासकीय बदलीमध्ये बदली पात्र होत असतात. या कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासन सध्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात करीत आहे. मात्र जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले अनेक कर्मचारी प्रशासकीय बदलीस पात्र असून ते सातारा जिल्हा परिषद मुख्यालयाच्या आसपास असलेल्या पंचायत समित्यांमध्ये बदली स्वीकारून त्या आस्थापनेवर हजर न होता केवळ जिल्हा परिषदेमधील अधिकाऱ्यांच्या मर्जी खातर  जिल्हा परिषदेमध्येच प्रतिनियुक्तीवर कार्यरत ठेवले जात आहेत. 
      
गेल्या अनेक वर्षांपासून काही कर्मचारी हे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातच अशा पद्धतीने कामकाज करीत आहेत. अशा कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने हे कर्मचारी मुख्यालयातच कार्यरत राहतात, वेतन मात्र बदली झालेल्या ठिकाणी घेतात. हे नियमबाह्य आहे. त्यामुळे किमान यावर्षी प्रशासकीय बदलीने बदली स्वीकारलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करून बदली ठिकाणी हजर राहण्याचे आदेश व्हावेत.
       
यावर्षी प्रशासकीय  अथवा विनंती बदलीने  बदली घेऊनही मुख्यालयातच कार्यरत राहिलेले आढळून आल्यास राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्हा परिषदेच्या समोर या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत राहील. याची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घ्यावी असा इशारा साधू चिकणे यांनी आपल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

न्यूज मराठी लाईव्ह 
सातारा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने