वाघांच्या शिकाऱ्यांचं विदर्भ ते चीन नेटवर्क, बहेलिया टोळीला अटक, कुठून येतात हे शिकारी ?


राज्यातील जंगलांमध्ये 12 वर्षानंतर पुन्हा बहेलिया शिकाऱ्यांचा शिरकाव झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मध्य चांदा वनविभागानं वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या शिकाऱ्यांना अटक केली आहे.

यानंतर वाईल्डलाइफ क्राईम कंट्रोल ब्युरोने देशभरातील व्याघ्र प्रकल्पांना रेड अलर्ट दिला असून गस्त वाढवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

हे बहेलिया शिकारी कोण असतात? ते कुठून येतात? त्यांची शिकार करण्याची पद्धत काय असते? हे समजून घेऊयात.

पण, त्याआधी चंद्रपुरात या शिकाऱ्यांना कशी अटक करण्यात आली? त्यांच्या चौकशीमध्ये आंतराराष्ट्रीय व्यापाऱ्यासंबंधी काही कनेक्शन पुढे आलंय का? हे जाणून घेवूयात.

चंद्रपुरात बहेलिया शिकाऱ्यांना कसं पडकलं?

मध्य चांदा विभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांनी दिलेल्या माहितीनुसार, इथल्या संरक्षित वनात गस्त घालणाऱ्यांना एक व्यक्ती शिकारीच्या साहित्यासह आढळली होती. विचारपूस केली असता त्यानं अजित राजगोंड उर्फ अजित पारधी असं नाव सांगितलं.

अजित हा सराईत गुन्हेगार असल्याचं वनविभागाला माहिती होतं. कारण, त्याला याआधीही अटक करण्यात आली होती. त्यामुळं अजितला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याच्याकडं शिकारीची हत्यारं आढळून आली.

तो राहत असलेल्या ठिकाणी छापेमारी केली असता तिथंही शिकारीचे सापळे, हत्यारं आणि एका खड्ड्यात वाघाचा तुटलेला दात, हाडाचा तुकडा आणि झाडाच्या खाली केस आढळून आले. अजितच्या चौकशीदरम्यान त्यानं साथीदारांच्या मदतीनं वाघाची शिकार केल्याची कबुलीही दिली.

त्यानंतर अजित राजगोंडसह त्याच्या कुटुंबालाही अटक करण्यात आली आहे. यामध्ये त्याची पत्नी रिमा, इंजेक्शन पारधी, रविना, सेवा, राजकुमारी यांचा समावेश असून पंजाबमधील सोनू सिंगलाही अटक करण्यात आली आहे.


बहेलिया टोळीला अटक केल्यानंतर चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

या टोळीच्या चौकशीनंतर अजितचे कॉल रेकॉर्ड्स आणि आर्थिक व्यवहार यावरून या टोळीचं बाहेर कनेक्शन असल्याचं समोर आलं. त्याआधारे शिलाँग इथून माजी सैनिक लालनेईसंगला अटक करण्यात आली आहे.

शिकारी अजित राजगोंडच्या झोपडीमध्ये सापडलेलं साहित्य जप्त करून नागपूर आणि हैदराबादला तपासणीसाठी पाठवण्यात आलं.

यामध्ये दात आणि केस वाघाचे असल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या तरी या टोळीनं एका वाघाची शिकार केली असल्याचं पुराव्यावरून स्पष्ट झालंय.

तसेच आणखी दुसरे अवयव सापडले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. पण या शिकाऱ्यांनी अधिक वाघांची शिकार केली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


मध्य भारत ते चीन, कसं आहे आंतरराष्ट्रीय कनेक्शन?

वनविभागानं शिलाँगमधून एका माजी सैनिकाला अटक केली. त्यामुळं या टोळीचे आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांसोबत कनेक्शन असण्याची शक्यता आहे का? याबद्दल आम्ही महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव रक्षक विवेक खांडेकर यांच्यासोबत बोललो.

ते म्हणाले की, "यात नक्कीच आंतराराष्ट्रीय व्यापाऱ्यांसोबत कनेक्शन आहे. या शिकारी टोळींकडून वाघाचे अवयव म्यानमारला जातात, तिथून पुढे ते चीनच्या मार्केटमध्ये विकले जातात अशी माहिती मिळाली आहे.

या शिकारी टोळीचा आधीचा इतिहास पाहता आणखी बाहेरचे कोण कोण यात सहभागी आहेत त्चदृष्टीनं आम्ही तपास करत आहोत."

ही टोळी फक्त विदर्भ आणि मध्य भारतातच नाहीतर दक्षिण भारतासह देशभरात सक्रीय आहे. त्यामुळे देशभरातील व्याघ्र प्रकल्पांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

पण, या शिकाऱ्यांनी नेमक्या किती वाघांची शिकार केली याबद्दल कुठलेही वनाधिकारी बोलायला तयार नाहीत. आम्ही आकडा सांगितला, तर आमच्या तपासावर त्याचा परिणाम होतो, असं त्यांचं म्हणणं आहे.

कोट्यवधी रुपयांचे व्यवहार

वनविभागानं बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंडच्या आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून शिलाँगवरून माजी सैनिकाला अटक केली.

या टोळीमध्ये नेमके किती रुपयांचे व्यवहार झाले? याबद्दल विचारलं असता खांडेकर म्हणाले, "आम्हाला नेमका आकडा सांगता येणार नाही. कारण, सध्या एसआयटीमार्फत शिकाऱ्यांच्या टोळीची चौकशी सुरू आहे. पण, हे व्यवहार कोट्यवधी रुपयांमध्ये झाले आहेत."

वाघाचे अवयव एका टोळीकडून दुसऱ्या टोळीकडे हस्तांतर झाल्यानंतर त्यानुसार त्यांचे व्यवहारही बदलत जातात. यामुळं रॅकेटचा तपास पूर्ण होईपर्यंत व्यवहाराचा नेमका आकडा समोर येणं कठीण आहे.

2012-13 मध्येही घातला होता धुमाकूळ

अजित राजगोंड हा वाघाची शिकार करण्यात तरबेज आहे. 2012 मध्ये विदर्भात एकापाठोपाठ वाघांची शिकार झाली होती.

त्यानंतर व्याघ्र प्रकल्पांना रेड अलर्ट घोषित करण्यात आला होता. या वाघांच्या शिकारीमागे बहेलिया शिकाऱ्यांची टोळी होती. अजित राजगोंड हा मोस्ट वॉन्टेड होता. त्याला 2014 मध्ये तिरुपती इथून अटक करण्यात आली होती.

ही शिक्षा पूर्ण करून बाहेर पडल्यानंतर मध्य प्रदेश वनविभागानंही त्याला अटक केली होती. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला. आता पुन्हा महाराष्ट्राच्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये सक्रीय झाल्याचं दिसून आलं.

2012-2014 या काळात या बहेलिया शिकाऱ्यांनी जवळपास 40 वाघांची शिकार केली होती, असा दावा "कांतार, माध्यमांचे वनसंवर्धनात योगदान" या पुस्तकात केला आहे.

वन्यजीव अभ्यासक आणि लेखक डॉ. राजेश रामपूरकर यांचं हे पुस्तक आहे. त्यांनी "वनसंवर्धनात माध्यमांची भूमिका" या विषयावर पीएचडी केली आहे.

रामपूरकर म्हणतात की, बहेलिया शिकारीचं पहिलं प्रकरण नागपुरातील पेंच व्याघ्र प्रकल्पात समोर आलं होतं. आमडी फाट्यानजीक एका शेतात शिकाऱ्यांचा डेरा असल्याची माहिती मिळताच वनविभागानं कारवाई केली होती.

यावेळी चिका आणि मंमरू या दोन शिकाऱ्यांना अटक झाली होती. हे दोघेही वनकोठडीत असतानाच मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघाची शिकार झाल्याचं समोर आलं होतं. ती शिकार केल्याची कबुली चिका आणि मंमरू यांनी दिली होती.

पण, ही शिकार बहेलिया शिकाऱ्यांनी स्वतः नव्हे तर स्थानिक शिकाऱ्यांच्या माध्यमातून केल्याचं तपासात पुढं आलं होतं."

बहेलिया शिकाऱ्यांचा वावर पाहता वाघांच्या शिकार प्रकरणाचा तपास आधी सीबीआयकडं देण्यात आला होता. सीबीआयनं बहेलिया शिकाऱ्यांच्या टोळीला अटक केली होती. त्यावेळीही नेपाळमार्गे वाघांचे अवयव चीनला जात असल्याचं तपासात समोर आलं होतं.

शेवटी सगळ्या शिकाऱ्यांना अटक केल्यानंतर 2018 मध्ये वाघांची शिकार थांबली. त्यानंतर 2022 साली झालेल्या जनगणनेत वाघांच्या संख्येत 30 टक्के वाढ झाली होती.


बहेलिया शिकारी कुठून येतात?

बहेलिया शिकारी मूळचे मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील आहेत. ही जमात वाघांच्या शिकारीत तरबेज आहे.

वाघांची शिकार करणे हा त्यांचा अनेक पिढ्यांपासून चालत आलेला धंदा आहे. ते शिकारीसाठी विशिष्ट पद्धतीचा सापळा वापरतात.

बहेलिया समाजातील संघटीत टोळ्या स्टीलच्या जबड्याचे सापळे वापरण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. हे सापळे बहेलिया ट्रॅप किंवा कटनी ट्रॅप म्हणूनही ओळखले जातात. बहेलियाप्रमाणचे पंजाबमधल्या जमातीच्या टोळ्याही वाघांच्या शिकारीत तरबेज आहेत.

आता पंजाब आणि कटनी अशा दोन्ही टोळ्या एकत्र झाल्या असून मिळून वाघाची शिकार करत असल्याचा संशय असल्याचं मुख्य वन्यजीव रक्षक खांडेकर सांगतात.

हे बहेलिया शिकारी इतक्या मोठ्या प्राण्याची शिकार नेमकी कशी करतात? त्यांची कार्यपद्धती काय असते? याबद्दलही डॉ. राजेश रामपूरकर यांनी त्यांच्या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे.

बहेलिया शिकारी अशी करतात वाघांची शिकार

हे शिकारी शिकार करण्यापूर्वी जंगलाची रेकी करतात. ज्या जंगलात शिकार करायची तिथल्या शेजारच्या गावात राहायला जातात.

वैदू असल्याचं भासवून गावकऱ्यांचा विश्वास संपादन करतात. पण, ते ज्या गावात राहतात तिथं हत्यारं किंवा शिकारीचं साहित्य कधीच ठेवत नाही. जंगलाजवळच्या एखाद्या झाडावर लपवून ठेवतात. शिकारीआधी ते वाघांच्या भ्रमणमार्गाचा अभ्यास करतात.

ज्या दिवशी शिकार करायची असते त्या दिवशी पाणवठ्याजवळ जमिनीत सापळा लावतात. या सापळ्यावर पाय पडला की पाय घट्ट अडकतो आणि शिकारी वाघाच्या जबड्यात ओंडका फेकतात. यामुळे वाघाचा श्वास गुदमरतो आणि त्याचा काही क्षणात मृत्यू होतो.

कधी कधी वाघाच्या तोंडात भाला फेकून सुद्धा मारतात. पण, वाघाच्या कातडीला कुठेही इजा होणार नाही याची दक्षता घेतली जाते.

कारण, छिद्र पडलेल्या कातडीला बाजारपेठेत कमी किंमत मिळते. त्यानंतर वाघाची कातडी आणि नखं, दात असे अवयव काढून ते पुढच्या टोळीकडे पाठवले जातात.

यामध्ये पुरुषांसह महिलाही असतात. तसेच शिकाऱ्याचं पूर्ण कुटुंबही सहभागी असतं. शिकार पुरुष करतो. पण, तस्करी केलेल्या अवयवांची वाहतूक करण्याची जबाबदारी महिलांवर असते.

आर्थिक व्यवहारही महिला करतात. वाघाचे अवयव, कातडी या महिला स्वतःच्या कपड्याच्या आत बांधून रेल्वेतून या अवयवांची आदानप्रदान करतात. शिकारी ते ग्राहक यामध्ये अनेक व्यक्ती असतात. त्यामुळं या व्यवहारात प्रचंड गुप्तता पाळी जाते.


न्युज मराठी लाईव्ह





Post a Comment

Previous Post Next Post