प्रतिनिधी : श्री.लालासाहेब माने (पाटील)
वडूज (सातारा) : तीन तोळयाच्या नेकलेस सह महिलेची पर्स प्रामाणिकपणे परत करुन दौंड येथील भांडवलकर यांनी आपला प्रामाणिकपणा दाखविला. तर वडूज पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे सोन्याचा दागिना व पर्स परत मिळाल्याने तडवळे ता. खटाव येथील शोभा साहेबराव साबळे यांनी दौंड येथील अनिल भांडवलकर यांनी दाखवलेल्या प्रामिणकपणा बद्दल तर वडूज पोलिसांच्या कार्यकर्तृत्वा बद्दल आभार मानले. तडवळे ता. खटाव येथील शोभा साहेबराव साबळे या कातर खटाव येथून आपले तडवळे गावी एका अनोळखी खाजगी गाडीतून निघाल्या होत्या. गाडीतुन उतरताना घाई गडबडीत त्यांची पर्स गाडीतच विसरली. घरी गेल्यानंतर आपली पर्स व त्यामधील ३ तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार देण्यासाठी वडूज पोलीस ठाण्यात गेल्या. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरिक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कातर खटाव बीटचे पोलिस अंमलदार शिवाजी खाडे व गणेश शिरकुळे यांनी कातरखटाव येथील पोलीस पाटील घनश्याम पोरे, अमोल चव्हाण व ओंकार हजारे यांची मदत घेवुन सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले. या फुटेजच्या आधारे त्यांनी अनोळखी गाडीचा शोध घेतला. सदर गाडी ही दौंड जि.पुणे येथील असल्याचे लक्षात आले. या गाडीचा क्रमांक एम. एच.१४ डी. टी २६१५ असल्याचे निदर्शनास आले. तसेच ही गाडी अनिल विष्णनाथ भांडवलकर रा. दौंड जि.पुणे यांच्या मालकीची असल्याची खात्री झाली. त्यांना संपर्क करुन विश्वासात घेवून विचारपूस केली असता सदर गाडी मालकाने गाडीची पाहणी करून गाडीमध्ये सदर महिलेची पर्स विसरली असल्याची कबुली दिली.
सदर इसमाने सापडलेली पर्स वडूज पोलीस ठाण्यात आणून दिली. पोलीस कर्मचा-यांनी सदर महिलेस ही कल्पना देवून पर्स ताब्यात दिली. अनिल विष्णनाथ भांडवलकर यांनी दाखविलेल्या त्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल व पोलिसांच्या तपासातील हजरज बाबीपणाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / वडूज (सातारा)
