बातमी: श्री.अनिल करंदकर (पाटील)
खंडाळा : राजेंद्र विद्यालय,खंडाळा चे क्रीडा शिक्षक दत्तात्रय गणपतराव गाढवे म्हणजे सुपरिचित डीजी सर सेवानिवृत्ती समारंभ राजेंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय संकुल वतीने संपन्न झाला. समारंभाचे प्रास्ताविक सोमनाथ गर्जे यांनी केले. प्रारंभी खंडाळा विभाग शिक्षण समिती संचालक वसंतराव पंडित, सुभाष सावंत,माजी प्राचार्य हणमंत कवडे,नवनाथ ढमाळ,माजी सेवक रामभाऊ संकपाळ यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
प्राचार्य शब्बीर नालबंद म्हणाले-"शिक्षक विद्यार्थी जडण-घडणीत मोलाचे योगदान देत असतो,यासोबत समाजाची विधायक दिशा ठरवतो,डीजी सरांनी खडतर परिस्थितीशी झुंज देत आपली सेवा प्रामाणिकपणे केली, याचे फलीत म्हणजे राज्य आणि आंतरराष्ट्रीय खो-खो, कबड्डी आणि कुस्ती क्रीडा स्पर्धेत स्तरावर राजेंद्र विद्यालय चे नाव गाजत आहे.याचे सर्व श्रेय व्ही एन गाढवे आणि डीजी गाढवे सर यांना जाते, प्राचार्य नालबंद पुढे म्हणाले ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर डीजी सर निवृत्त होत आहेत असे असले तरीही मातीशी इमान असणारा वस्ताद वयोमानानुसार निवृत्त होत नसतो,यामुळे कागदोपत्री निवृत्ती झाली असली तरी राजेंद्र विद्यालय आणि संस्थेशी आपली बांधिलकी निरंतर आणि अखंड ठेवावी."
सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डीजी गाढवे म्हणाले-"मला मातीशी इमान घट्ट करणारे माझे दैवत शंकरराव गाढवे सर आहेत, माझ्यातला काहीसा खोडकर स्वभावगुण आणि खिलाडू वृत्तीने मला १९७८ साली इ.०४ थी मध्ये असताना राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत मी पहिल्यांदा "महाराष्ट्र कुमार केसरी" बनलो आणि जीवनाला कलाटणी मिळाली. यानंतर कुस्तीची मैदान जय-पराजय द्वारे जिंकताना मला शंकरराव गाढवे सरांनी वेळोवेळी प्रोत्साहन देत, १९८९-९० पदवी शिक्षण काळात शाहू कॉलेज पुणे, शिकताना अवघ्या ०६ सेकंदात कुस्ती जिंकत मातीतल्या कुस्तीला न्याय दिला. पुढे १९९१-९२ बी.पीएड. पूर्ण केले २२ ऑक्टोबर १९९३ पासून ३० सप्टेंबर २०२४ पर्यंतच्या ३३ वर्ष सेवाकाळात अनेक चढ उतार आले पण खडतर परिस्थितीशी दोन हात करत कुटुंब जबाबदारीत कमी पडलो नाही.नोकरी प्रारंभी अखंड साथ देणारे गुलाबराव संकपाळ आबा मला आजही साथ देतात.असंख्य विद्यार्थ्यांना खेळाडू म्हणून ओळख निर्माण करून देताना वेळप्रसंगी आर्थिक तूट सोसली,या कार्यात अविरतपणे साथ देणारे अनेक मित्र भेटले पण क्रीडा शिक्षक व्ही.एन. गाढवे आणि मी जीवस्य कंठस्य कायम आहोत..."
वरिष्ठ महाविद्यालय शिस्त विभागप्रमुख प्रा. अमीर इनामदार म्हणाले-"शंकरराव गाढवे सरांच्या शैक्षणिक संकुलात रुजू होणारा नविन सेवक असूनही प्रदीर्घ अनुभवी असणाऱ्या डीजी गाढवे आणि व्हीएन गाढवे सरांनी कोणताही अभिनवेश न बाळगता मला खूप काही शिकवल,शिकवतात.डीजी सरांच्या विचार आणि कृतीचा वारसा मी नेटाने पुढे नेईन अशी ग्वाही देतो"
उपस्थित अतिथीमध्ये संचालक, माजी प्राचार्य, शिक्षिका निगडे आणि विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. आभार पर्यवेक्षक धनंजय महामुनी यांनी मानले.यावेळी राजेंद्र विद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय मधील सर्व विद्यार्थी,शिक्षक उपस्थित होते.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / खंडाळा
