वित्तीय साक्षरता काळाची गरज ! अमोल मारेकर

बातमी : श्री.अमिर इनामदार

वाई : जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय, वाई येथे वाणिज्य व व्यवस्थापन विभाग व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेक्युरिटीज मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने वित्तीय साक्षरता या विषयावर दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेबीचे प्रशिक्षक श्री अमोल मारेकर यांनी 'भांडवली बाजारातील संधी' या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. विनोद वीर होते याप्रसंगी कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य श्री. भिमराव पटकुरे व रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपले विचार मांडताना मारेकर म्हणाले, आजच्या काळात विद्यार्थ्यांनी शेअर मार्केटचे ज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अर्थार्जनाच्या संधी प्राप्त होतील. अलीकडे लोक बँकेपेक्षा म्युच्युअल फंडामध्ये अधिक गुंतवणूक करत आहेत. शेअरची खरेदी विक्री करताना जी फसवणूक होते त्यापासून खरेदीदारांनी सावध राहणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांना वित्तीय साक्षरतेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना आगामी काळामध्ये आर्थिक सल्लागार म्हणून खूप संधी उपलब्ध आहेत त्यासाठी आवश्यक असणारे वित्तीय ज्ञान व कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करून योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास आर्थिक स्थैर्य प्राप्त करता येते. गुंतवणूकदारांनी भांडवली बाजाराकडे दीर्घकाळ गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. वीर यांनी जगातील सर्वात मोठी संधी म्हणून शेअर मार्केटकडे पाहिले पाहिजे असे सांगितले. संपत्ती व्यवस्थापनामध्ये वित्तीय साक्षरतेचे महत्व त्यांनी विशद केले. अध्यक्षीय समारोपामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, वित्तीय साक्षरता अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी या क्षेत्रामध्ये असणाऱ्या विविध संधीचा शोध घेऊन आपल्या कौशल्याने संधी मिळवाव्यात व त्यासाठी खडतर परिश्रम करावेत. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य श्री. भिमराव पटकुरे व कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये कार्यशाळेचे संयोजक श्री. संदीप पातुगडे यांनी कार्यशाळेचे महत्त्व सांगून तिची उपयुक्तता विशद केली. श्रीमती दिपाली चव्हाण यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. या कार्यक्रमाचे आभार श्री. रवींद्र जमदाडे यांनी मानले तर सूत्रसंचालन श्रीमती श्रुती यादव यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी श्री. जयवंत 
पवार, श्रीमती प्रज्ञा पवार व श्रीमती रेखा भोसले तसेच वाणिज्य मंडळातील सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.या कार्यशाळेत महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


न्यूज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / वाई

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने