बातमी : श्री.अनिल करंदकर (पाटील) जावली
मेढा : ता. जावळी तालुक्यात वनवे लावण्याचे सत्र सातत्याने सुरू मेढा मोहाट पुलाजवळील मोहाट व पिंपरी गावच्या हद्दीतील डोंगराला लावलेल्या वनव्याने परिसरात उभ्या असलेल्या दोन आराम बस अक्षरश जळून राख झाल्या त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले असून वनवे आता मानवी वस्तीत घुसू लागल्याने चिंता वाढली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मेढा मोहाट पुलाजवळ मोहाट गावच्या हद्दीत बिगरशेती केलेली प्लाटींगची जमिन आहे. या ठिकाणी काही लोकांनी घरे सुद्धा बांधलेली आहेत. याच ठिकाणी मोकळ्या जागेत काही वर्षांपासून दोन मोठ्या आरामबस उभ्या आहेत. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने लावलेल्या वनव्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात आग भडकली. त्यात सायंकाळी हवेचा जोर असल्याने आग वेगाने पसरत या गाड्या उभ्या असलेल्या परिसरात आली. हा हा म्हणता या दोन्ही गाड्यांनी पेट घेतला.
गाड्या पेटताच गाडीतून मोठाले आवाज होत होते. जवळपास कोणी नसल्याने आग पसरत गेली. त्यात मेढा परिसरात आग विझवणारे बंब नसल्याने व या गाड्या नेमक्या कोणाच्या आहेत हे माहीत नसल्याने आग विझवण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. परिणामी संपूर्ण गाड्यांचा अक्षरशः कोळसा झाला. या परिसरात असलेली घरे ही वनव्याने वेढली होती. ह्या घरांमधे राहायला कोणी नसल्याने हा परिसर दुर्लक्षित आहे. परंतु सुदैवाने कोणत्या घराला आग न लागल्याने अजून नुकसान होण्याचे टळले गेले.
वनविभाग सुस्त...
वनव्यांचे लोण आता अगदी माणसाच्या घरापर्यंत आले तरी यातून वनवा लावणारे किंवा प्रतिबंध करण्यासाठी असलेला वनविभाग कोणीही धडा घ्यायला तयार नसून वनविभागाच्या सुस्त कारभाराने जावळीतील अनमोल वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत वनवा लावणाऱ्यांविरूद्ध एकही कारवाई न झाल्याने वनवा लावणारे सुसाट असून मानवी व वनसंपत्तीचे न भरून येणारे नुकसान होत आहे.
न्युज मराठी लाईव्ह
मेढा (जावली)

टिप्पणी पोस्ट करा